तिने जाऊन थपाथपा थंड पाणी
मारून घेतलं. धाप लागल्यासारखी ती धपापत होती. रखरखत्या ऊन्हातून चालत असताना
प्रचंड तहान लागल्यावर घसा जसा पाण्याच्या थेंबासाठीही आसुसलेला असतो तशी तिची
अवस्था झाली होती. तिने पुन्हा नळ चालू केला. पाणी जोरात बादलीत पडत होतं. पाण्याचा
होणारा आवाज तिला तिच्यावर हसत असल्यासारखा भासला. चिडून तिने जेमतेम अर्धीच
भरलेली बादली खेचली आणि पुन्हा पाण्याचा मारा करून घ्यायला सुरूवात केली. नळ चालूच
होता. फिदीफिदी हसत. तिने रागातच बादली पुन्हा नळाखाली ढकलली. होता नव्हता तेवढा
सगळा जोर लाऊन तिने नळ बंद केला. एक जोरात निःश्वास टाकून ती कपाळावर आठ्या घेऊन
स्वतःकडे तशीच बघत बसली. एव्हाना पायांना मुंग्या यायला लागल्या होत्या. कंटाळून
ती उठली. चड्डी घालून, एक मोठ्ठा श्वास घेऊन ती संडासातून बाहेर आली. बेसिनपाशी जाऊन
भस्सकन नळ सोडला. पुन्हा पाणी तिच्यावर हसू लागलं. आता तिला सहन होत नव्हतं.
रागारागात तिने पुन्हा पाण्याचा मारा सुरू केला. यावेळी चेहऱ्यावर. नळ चालूच. धाप
लागलेलीच. तहान भागत नव्हती. थंड पाण्याचा काहीच उपयोग होत नव्हता. चेहऱ्यावर
मारलेल्या पाण्याचे ओघळ तिच्या गळ्यावरून खाली धाव घेऊ लागले. त्यांचीही एकमेकांशी
शर्यत लागल्यासारखीच होती. एक थेंब ओघळत ओघळत थेट तिच्या बेंबीपर्यंत गेला. एक
गळ्यावरच थांबला. एकाने सरळ जमिनीवर उडी मारली. एक छातीवर गेला. डोळे मिटले असूनही
प्रत्येक थेंबाची वाट तिला स्पष्ट दिसत होती. बाकीचे थेंब कुठे गेले? तिने डोळे उघडले. समोर
आरशात पाहिलं. तिचा टी-शर्ट गळ्यापाशी ओला झाला होता. चेहऱ्यावर पाणी मारताना काही तुषार बाह्यांवर,
पोटापाशीही उडाले होते. पण गळ्यापाशी टी-शर्ट गच्च ओला झाला होता. अर्ध्या थेंबांना
गळ्यापाशीच पिऊन टाकणाऱ्या टी-शर्टचा तिला भयंकर राग आला. तावातावात तिने टी-शर्ट
काढला आणि भिरकावला. कुठे पडला काय माहिती. पण तिची धाप मात्र अजूनही कायम होती. थेंब
ओघळत होते तसा मिटलेल्या डोळ्यांनी त्यांच्या स्पर्शाचा पाठलाग करताना तिच्यावर
हसणाऱ्या पाण्याचा आवाज तिला ऐकू येणं बंद झालं होतं. टी-शर्ट भिरकावल्यावर एकाएकी
तो आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला. छाती आणि डोकं फुटायची वेळ आली होती. तिने परत
स्वतःवर निर्दयीपणे पाणी मारून घ्यायला सुरूवात केली. चेहऱ्यापासून पुरेसे ओघळ खाली उतरू
लागल्यावर तिने नळ बंद केला आणि बेसिनला घट्ट धरून, खाली मान घालून, डोळे गच्च
मिटून बेसिनपासच्या पिवळ्या प्रकाशात उभी राहिली. आरशात कोणीच दिसत नव्हतं. यावेळी
बरेच ओघळ छातीपर्यंत पोहोचले. तिला दम लागला होता. ती एका विचित्र ग्लानीत होती.
हळुहळू शांत वाटू लागलं तसे तिने डोळे उघडले. एक दोन क्षण तिला अंधाऱ्या आल्या. तो
पिवळाधम्मक प्रकाश तिला टोचत होता. पुन्हा एक निःश्वास टाकत ती पलंगापाशी आली.
लॅपटॉपवर मगाशी चालू असलेला व्हिडिओ अजून संपलाच नव्हता. तिला गळून गेल्यासारखं
झालं. तिने स्वतःला पलंगावर पालथं झोकून दिलं. तिचा एक हात खाली लोंबकळत होता.
हळुहळू तिला हातापायांतून त्राण जात असल्याचं जाणवायला लागलं. ग्लानीमुळे ती धड
जागीही नव्हती आणि धड झोपेतही नव्हती. धपापणाऱी छाती शांत होऊ लागली तशी तिला आपण
फार बंदिस्त असल्याची जाणिव झाली. लोंबकळणारा हात पाठीवर नेऊन तिने ब्रेसिअरची
हुकं उघडली आणि हात पुन्हा अधांतरी सोडून दिला. दम कमी झाला तसा ढोल बडवल्यासारखा
जोरजोरात ऐकू येणारा छातीच्या ठोक्यांचा आवाजही कमी होऊ लागला. श्वासांची गतीही
कमी झाली. हे सगळे आवाज कमी होऊ लागले तशी तिला काहीतरी कुजबूज ऐकू येऊ लागली.
तिने पुन्हा डोळे उघडले. बेसिनचा पिवळ्या प्रकाश पलंगापर्यंत गोष्टी चाचपडता येतील
इतपतच पोहोचत होता. बाकी खोलीभर अंधार. तिने पडल्यापडल्याच किलकिले डोळे इकडे
तिकडे फिरवले. टेबलावरच्या असंख्य गोष्टी तिच्याच ग्लानीत निपचीत पडून होत्या.
कपाटाचं बोडकं डोकंपण शांतच होतं. पडल्यापडल्याच तिने मान फिरवली, तर दुसऱ्या
बाजूला लॅपटॉपची स्क्रीन चार बोटांच्या अंतरावर. व्हिडिओ अजूनही चालूच होता. तिने
लॅपटॉपवर नजर फिरवली. स्क्रीनपासून किबोर्डपर्यंत, किबोर्डपासून शेजारी
पोर्टपर्यंत. तिथे हेडफोन्स जोडलेले दिसले. मगाशी तहानलेल्या, चवताळलेल्या, पाय
दोन दिशांना पसरून पडलेल्या तिच्यासारखेच हेडफोन्सही पडले होते. व्हिडिओतल्या दोघांची
उत्तेजक आरडाओरड हेडफोन्समधून कुजबूज म्हणूनही तिला सहन होत नव्हती. तिने वैतागून
पडल्यापडल्याच एका हाताने थेट ब्राऊजर बंद केलं. फक्त स्क्रीन, काही आयकॉन्स उरले.
मगापासून व्हिडिओच्या काळ्या बॅकग्राऊंडमुळे झाकळलेली स्क्रीन अचानक फुल
ब्राईटनेस असल्यासारखी प्रकाश ओकू लागली. तिचे डोळे झापकन बंद झाले. मग कपाळावर आठ्या आणत एकच डोळा
किलकिला उघडत तिने स्क्रीनकडे पाहिलं. तिचं लक्ष खाली उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या
घड्याळाकडे गेलं. पावणेसात होत होते. ते बघून ती ताडकन जागी झाली. पोटापर्यंत उठून
हातांवर जोर देत ती स्क्रीनकडे बघत बसली. साडेसहा ते सात ही दिवेलागणीची वेळ असते,
तेव्हा लक्ष्मी घरात येते. म्हणून दिवापणती करावी, दारं उघडावी, घर सुगंधीत करावं
हे आईचं भाषण तिला आठवलं. कंटाळून तिने लॅपटॉपची स्क्रीन तशीच बंद केली आणि सरळ
होऊन पडली. मगासारखीच. पण आता डोकं पलंगाच्या उलट्या दिशेला होतं. दोन्ही हात, पाय
पलंगावर मावत होते. पाण्यावर तरंगणाऱ्या प्रेतासारखी ती पडून राहिली..पण डोळे उघडे
ठेऊन. छताकडे बघत. बेसिनकडून डोकावणारा पिवळा प्रकाश तिच्यावर हलकाच पसरला होता.
आता हुकं उघडलेल्या ब्रेसिअरनेही तिला बांधल्यासारखं वाटू लागलं. तिने काहीच
घेणंदेणं नसल्यासारखी ब्रेसिअरही काढून भिरकावली. ती पण कुठे पडली काय माहिती.
तिने मोठ्ठा श्वास घेतला. छातीभरून. पाच वर गरागरा फिरणारा पंखा पाहून तिला
मगाच्या चढाओढीची आठवण झाली. चढलेले श्वास आणि लागलेली धाप आठवली. कडाडणारी एखादी
वीज अंगात नखशिखांत सळसळून जावी असं वाटणं आठवलं. त्यासाठी धडपडत लावलेला व्हिडिओ
आठवला. काळी स्क्रीन आठवली. नकळत तिच्या श्वासांची गती पुन्हा वाढली. पंखा पाचच्या
गतीने न थकता फिरतच होता. प्रयत्नांती दुखणारा
खांदा आठवला. फिदीफिदी हसणारं पाणी आठवलं. संडासात बसल्या-बसल्याच स्वतःला
न्याहाळणं आठवलं. चेहऱ्यावर थपाथपा मारलेलं थंड पाणी आठवलं. व्हिडिओतल्या
मुलीसारखे पाय फाकवून पडलेले हेडफोन्स आठवले. कान फाटतील इतक्या आवजात
हेडफोन्समध्ये ऐकलेली त्यांची चढाओढ आठवली. तिने मुठांनी गादीवरची चादर घट्ट धरायला सुरूवात केली होती. मग तिने डोळे मिटून घेतले. पिवळा प्रकाश नाहीसा झाला. आता तिला
लाल, तांबड्या, भडक पिवळ्या रंगांची वेगवेगळ्या आकारांची, एकमेकांत गुंतलेली
वर्तुळं दिसू लागली.. तिने डोळे आणखी गच्च मिटले तसतशी ती लाल तांबडी वर्तुळं आणखी
जवळ येऊ लागली. सूर्याकडे सलग दोन तीन मिनिटं बळजबरी पहावं आणि डोळे दिपून अनंतात
विलिन करणाऱ्या प्रकाशाने आपल्याला व्यापून टाकावं एवढा उजेड तिला मिटलेल्या
डोळ्यांनेही दिसला आणि ती दचकून जागी होऊन उठून बसली. मग पुन्हा अंधाऱ्या आल्या.
केस सावरत, मोठ्ठे मोठ्ठे श्वास घेत ती पाण्याची बाटली शोधायला पलंगावरून उतरली.
अजूनही नीटसं काही दिसत नव्हतं. अंदाजे टेबलाच्या दिशेने ती पावलं टाकू लागली, तशी
तिच्या पायात मगाशी भिरकावलेली ब्रेसिअर आली. तिलाही तशीच फरफटवत ती टेबलापाशी
पोहोचली. पसाऱ्यात कुठेही हात मारत तिने बाटली शोधली आणि घटाघटा पाणी पिऊ लागली.
तरीही तहान भागली नव्हतीच.

हवं तेव्हा वीज सळसळायला हवी. ती सळसळायच्या आधीच्या आणि नंतरच्या साक्षात्कारांमध्ये टोकाचा फरक असतो.
ReplyDeletethat's quite an acute one!