आम्हा बायकांचे रंगज्ञान

बायांची त्यांना समजणाऱ्या रंगांवरून मस्करी करणं काही नवीन नाही. मस्करी ही तर खूप सौम्य पायरी झाली, त्यांची टिंगलटवाळी केली जाते, पुढे खिल्लीही उडवली जाते. त्यांना काय तर रंगच नव्हे, तर रंगछटाही कळतात. प्रत्येक छटेचं नावही माहिती असतं. आणि त्या कोणत्या मूळ रंगाच्या छटा आहेत हे ही सांगता येत असतं. पण आपल्या समाजाची जडणघडणच महान! स्त्रियांना कमी लेखणं, त्यांची खिल्ली उडवणं, त्यांना नावं ठेवणं हेच काय ते सगळ्यांचं काम. मग तुम्ही पुरूष असा वा स्त्री, लहान असा किंवा मोठे, टार्गेट कोण तर कायमच एक स्त्री. बिचाऱ्या बायांना कमी माहिती असो वा जास्ती, त्यांची मस्करी केल्याशिवाय काही कोणाला रहावत नाही. याच मुद्द्याला नीट मांडायचं झालं तर असंही म्हणता येईल, की बायांना माहिती 'असलेल्या' विषयांना महत्व द्यायचंच नाही  आणि माहिती 'नसलेल्या' विषयांना डोक्यावर उचलून धरायचं. या विषयांची रेंज रंगांपासून शेअर मार्केटपर्यंत आहे. किंवा यांच्याही अलिकडे ते पलीकडे आहे. यात बायकाच अडकतात, हे मात्र खरं. 



खरं तर मला फारच आश्चर्य आणि कौतुक वाटतं त्यांच्या (की आमच्या म्हणू?) या कौशल्याचं!  एखाद्या वस्तूचं वर्णन त्यांना (इतर गोष्टींबरोबरच किंवा फक्त) रंगावरूनही चपखल करता येतं! त्या प्रत्येक वस्तूची नोंद आणि दखल त्या वस्तूंचे महत्व, गुणधर्म, उपयोग या पुढे जाऊन त्याच्या दिसण्यावरूनही घेतात. का नाही घेणार? त्यांच्यासाठी अपिअरन्स आणि रंग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ८० ते ९० (काही जणी तर १००) % वेळ स्वयंपाकघरात घालवणाऱ्या या बायांचा रंगांशी फारच जवळून संबंध येतो. नुसतं दिसण्यापलिकडे त्यांचं रंगाशी नातं तयार होतं.  त्या रंगाच्या वस्तूशीही होतंच, पण रंगांशी जास्त! 


रोज पाणी भरताना त्यांना माठाचा काळा रंग दिसतो आणि स्वयंपाक करताना ओट्याचा! तरी दोन्ही काळ्या रंगांमध्ये त्या फरक सांगू शकतात! पालकाचा हिरवा वेगळा, मेथीचा वेगळा, शेपूचा वेगळा, भेंडीचा वेगळा. त्या शिजवल्यावरचा होणारा हिरवा रंग वेगळा आणि नंतर वरून कोथिंबीर घालताना कोथिंबीरीचा हिरवा वेगळा हे  रोजच्या रहाटगाडग्यात कोणाच्या लक्षात येणार नाही? तिखट मिरच्यांचा हिरवा आणि कमी तिखट मिरच्यांचा हिरवा वेगळा, पिठाच्या मिरच्यांचा हिरवा वेगळा, ढोबळी मिरच्यांचा हिरवा वेगळा, काकडीचा वेगळा, आणि झुकीनीचा वेगळा! या भाज्या आकारावरून सगळ्यांनाच ओळखू येतील, पण याच भाज्यांचे हेच रंग कपड्यांवर किंवा रंगपेटीत योग्य ओळखून दाखवले की का बिचाऱ्या बायांना बोलायचं? 


तूर आणि चणाडाळीचाही रंग वेगळा, पॉलिश केलेल्या आणि न केलेल्या डाळींचे रंग वेगळे, आंब्याचा पिवळा वेगळा, केळ्यांचा वेगळा, बेल-पेपर (फिरंगी ढोबळी मिरची) चा पिवळा वेगळा, कुजून खराब होणाऱ्या कोथिंबीरीचा अगदी सडायच्या आधी दिसणारा पिवळा वेगळा, हळदीचा पिवळा वेगळा आणि तेलाचा पिवळाही वेगळाच. तरी त्या मँगो कलर, मस्टर(मस्टर्ड!), ब्राईट येलो म्हणाल्या की सोबतचा (आणि आजूबाजूचेही) ४ पुरूष हसलेच म्हणून समजा! 


जिऱ्याचा तपकिरी, मसाल्याचा तपकिरी, आल्याचा, ओल्या हळदीचा, कच्च्या आणि भाजलेल्या धण्यांचा, मुखवास म्हणून खाणाऱ्या धणाडाळीचा, कॅडबरीचा, डार्क चॉकलेटचा, चिकूचा, बीटाचा वेगळा. तांदळाचा, ओल्या नारळाचा, सुक्या खोबऱ्याचा, रव्याचा, पोह्यांचा, कुरडयांचा, मैद्याचा, तांदळाच्या पिठीचा, इडलीच्या पिठाचा, खायच्या सोड्याचा, अंड्याचा, दुधाचा, दह्याचा, सायीचा, सायीच्या दह्याचा, साबुदाण्याचा.. सगळे पांढरे वेगळे. 


एवढंच काय, त्यांना फ्रीजमध्ये ठेवलेल्या एव्हरेस्टच्या (किंवा कोणत्याही ) मसाल्याच्या पाकीटांचेही रंग पाठ झालेले असतात. वरवरती सारखेच दिसणारे पावभाजी, सांबार, जलजीऱ्याचे खोके त्यांना वेगवेगळ्या रंगाचे म्हणून सहज ओळखता येतात. चाट मसाला, जीरे पावडर आणि आमचूर पावडरीचा खोका त्यांना नावं न वाचता ओळखू येतो. घ्यायचा होता एक आणि काढला दुसराच खोका असं काही त्यांच्याकडून होत नाही. 


लाल/गुलाबी गाजर आणि केशरी गाजर यातला फरक त्यांना कळतो! टोमॅटो, कश्मिरी मिरची, तिखट आणि कमी तिखट 'तिखट' (पावडर) हे ही त्यांच्या रंगकोषात वेगळे असतात. 


"काचऱ्या जsssरा खरपूsssस होऊ देत गं" अशी फर्माईश आल्यावर गॅस त्या शिजल्यानंतर पण जळायच्या आत चव न घेता बरोब्बर 'टायमावर' बंद कसा करायचा हे त्यांचं त्यांनाच कळतं! खरपूस हा ही त्यांच्यासाठी रंगच झाला! 


आपल्याकडे कितीतरी रंगांची नावं तर आपल्या सभोवतालातूनच आलीयेत! शेवाळी कलर काय, जांभळा काय, वांगी कलर काय आणि मेंदी कलर काय! जर मूळात रंगांची नावंच जगण्यातले संदर्भ घेऊन ठेवली गेली आहेत आणि ते आपण मान्य केलं आहे, तर यांचे हे संदर्भ आणि नावंही चालवून घेऊया!


सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जर एवढे रंग त्यांचे सवंगडी होत असतील तर का म्हणून मस्करी करायची? 😄

-बाईची डायरी
अदिती कापडी
१६ फेब्रुवारी २०२१, संध्याकाळी ७.११ वा. 

Comments