"मुडद्या लोकांतुन वसताना, माझे मजला येवो हसे"
या दुनियेची गंमत न्यारी
मंद माकडे गुणी मदारी
माणुसकी कधी इथे सापडे
कधी कुणाची दुनियादारी
अजुनी शाळाशाळांमध्ये
रोज शिकवती राणी झाशी
तरी कुणाचे वस्त्र फाटते
तरी कुणाची टळते फाशी
वेगवेगळ्या राज्यांमधुनी
इथले पाणी प्रवास करते
भागत नाही तहान त्यांची
तरीही मौनच उत्तम ठरते
आणि मग हे मोर्चे काढी
मोजकीच जिवंत माणसे
इतर ठोकळी त्यांना म्हणती
"भाई, आगे बढो शानसे"
घोट्याळ्यांच्या इस्पितळाला
भष्टाचाराची अन् सर्दी
पळापळीच्या समाजातुनी
बघणाऱ्यांची अलोट गर्दी
कुणी पहातो घरीच बसल्या
कुणी पहातो किंवा कसे
मुडद्या लोकांतुन जगताना
माझे मजला येवो हसे
अदिती कापडी
२७ जानेवारी २०१३
Comments
Post a Comment