कविता- काजळलेल्या संध्याकाळी

"फांदीवरल्या घरट्यामधुनी, मुग्ध शांतता चिवचिव व्हावी"

काजळलेल्या संध्याकाळी
तुझी नी माझी भेट घडावी
नजरेतुन संवाद उमलता
लाजुन ही सृष्टी मुरडावी

शांत गुलाबी वाऱ्याने मग
नाचत नाचत खेळ करावे
वाहुन सळसळ वातावरणी
प्रेमाचे अन् रंग भरावे

अवती भवती जुईराणीने
टपकत टपकत साथ करावी
फांदीवरल्या घरट्यामधुनी
मुग्ध शांतता चिवचिव व्हावी

भुरभूर पाऊसधारा येता
आपण दोघे मोहुन जावे
एकमेकांच्या ह्रदयमधुनी
सुर्यास्ताचे दृश्य पहावे

अदिती कापडी
२८ मार्च २०१३
रा. ०७.५०

Comments