कविता- उगवता दिनकर

उगवता दिनकर
तिथं पल्ल्याड ढगांच्या
भूक चवताळी इथं
पोटी साऱ्या गरिबांच्या

डोळं भरून सकाळी
माय लेकराला पाही
पण काल राती बाप
मुळी झोपलाच नाही

दोघे करती विचार
कुठे गाडी ही न्यायाची
कशी लेकराच्या ओठी
तुप भाकर द्यायाची


पुन्हा केली कसरत
पोर दोरीवर चाले
बाप वाजवी ठोलकी
लोकं भिक त्याला घाले

गोळा केले दोन आणे
चार आणले तांदूळ
असे गरिब शेवटी
असे तोच त्यांचा गुळ




पुढे चाटुनिया भांडे
माय गायली अंगाई
पुन्हा उपाशीच बाप
राती झोपलाच नाही.

अदिती कापडी
१७ मार्च २०१३

Comments