ठाणे गेलं.. आमची लोकल पळत होती. स्लो असली तरी चांगली पळत होती. CST कडचा पहिला डब्बा- फर्स्ट लेडीज्. उगाच वाटून गेलं की गाडीत माझ्या मागच्या डब्ब्यांत बसलेल्या इतर सगळ्या माणसांपेक्षा मी पुढे आहे. त्यांच्यापेक्षा मी मोटरमनच्याही जास्त जवळ आहे. कोणतंही स्टेशन आलं की आधी मी त्या स्टेशनवर पोहोचणार...मग मागचे सगळे. खिडकीतून दिसणारी प्रत्येक गोष्ट आधी मला दिसणार मग मागच्यांना. फर्स्ट लेडीज ! मग सगळ्यांपेक्षा अजून अजून पुढे वाटत राहिलं. पण मी नक्की काय बघतेय ह्याचं विश्लेषण करायला शब्द नाहीत. (या लेखाला शीर्षक द्यायलाही नाहीच्चेत शब्द! म्हणून हा लेख निनावी.) कोणाच्या आधी काय आणि नंतर काय, दिसणारं दृश्य रोजचंच ! आता मुलूंड येईल, मग नाहूर, भांडूप, कांजूर वगैरे वगैरे.
प्रत्येक स्टेशनवर तीच गर्दी, तीच माणसं, तीच धावपळ. गाडी स्टेशनवर थांबेपर्यंत (मी सगळ्यांच्या पुढे असल्याने) सगळ्या डब्ब्यांत आता किती गर्दी चढेल याची तीच रोजची जाणिव, गाडी स्टेशनमधे आल्यापासून जेन्ट्स (खरंतर जनरल) डब्ब्यापाशी दिसणारे तेच ते रोजचे काळे पांढरे रंग, फार तर तिसरा रंग म्हणजे राखाडी किंवा त्याच्या छटा, तीच आडव्या नाहीतर उभ्या रेषांची नाहीतर प्लेन शर्टपॅंट घातलेली माणसं, मग लेडीज डब्ब्याच्या जागेवर "जगात अजूनही रंग शिल्लक आहे" या गोष्टीचा होणारा आनंद ! लेडीज डब्बा येणारा स्टेशनचा तो भाग म्हणजे अगदी रंगपेटी उघडून ठेवल्यासारखं भासणं ! तो भाग गेला की पुढचे काही डब्बे परत काळ्या पांढ-या माणसांची गर्दी. एक गोष्ट मात्र सगळ्याच डब्ब्यातल्या माणसांसाठी कॉमन ! खांद्याहून पुढे कांगारूच्या पिल्लासारखी लटक(व)लेली बॅग ! गाडी येताना आपला डबा, नंतर आपला दरवाजा आणि नंतर आपला रोजचा गृप दिसतो आणि मग स्टेशनवरच्या (आणि माणसांच्या डोळ्यातल्याही) हालचाली अजून भराभर व्हायला लागतात. ह्या हालचालीही रोजच्याच ! गाडीची गती हळू होते तोवर 'रोजचे' सगळे जण उतरलेले असतात. काही रोज नं येणारी किंवा म्हतारी माणसं अजूनही प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमांचं पालन करतात. गाडी पूर्ण थांबली की मगच उतरतात {आणि मग 'रोज' चढणा-यांकडून बोलणे (प्रसंगी शिव्या) ऐकतात}. तोवर मिळेल त्या दरवाजाने गाडी थांबेपर्यंत अनेक जणं गाडीत चढलेलीही असतात ! नंतर अजून एक रोजचा प्रकार सुरू होतो - कहा उतरोगेे ? कुठे उतरणार ? तुम्ही ? ओ शुक शुक विंडो, कुठे उतरणार ? जर कोणी तीन चार स्टेशनच्या आत उतरणारं सापडलंच तर डोळ्यांतली धावपळ, शोध संपून थोडंसं समाधान जागा घेतं. ज्यांना "कुठे उतरणार" चं उत्तर 'दादर' किंवा 'लास्ट' असं मिळतं त्यांच्याही डोळ्यांतला शोध संपतोच. त्याजागी डोळ्यात थोडीफार नाराजी जागा घेते. गाडीने हळुहळू वेग धरला की नव्याने चढलेल्या सगळ्यांचे हेडफोन्स बाहेर निघतात (काहींचे ऑलरेडी कानात असतातंच) किंवा काहींची पुस्तकंही बाहेर पडतात. कुठेही नं धरता बरोब्बर पुस्तक वाचणं, चॅटींग करणं जमत असतं. कारण ? रोजचंच झालंय ! तोवर दुसरं स्टेशन येतं. पुन्हा एकदा मी पुढे, काळी पांढरी राखाडी माणसं, रंगपेटी, डब्बा, दरवाजे, पटापट होणा-या हालचाली, कुठे उतरणार, हेडफोन, पुस्तक, स्टेशन, काळी पांढरी राखा....
इतक्यात CST पण येतंच, रोजसारखं, रोजचं..
अदिती कापडी.
२५ नोव्हेंबर २०१४
06:23 BL-CSTS, CST कडचा पहिला लेडीज,ठाणे स्टेशन.
06:23 BL-CSTS, CST कडचा पहिला लेडीज,ठाणे स्टेशन.

Comments
Post a Comment