आत्ता दापोली आणि आसपासची ट्रीप झाली तेव्हाचा किस्सा. यानिमीत्ताने लहानपणी शाळेत वक्तृत्त्व स्पर्धेत किंवा इतर कुठल्याही निमीत्ताने टिळकांवर भाषण करायची वेळ आली की सुरूवातीच्या ठरलेल्या दोन तीन ओळी ज्या कधी पाठ कराव्याच लागल्या नाहीत किंबहुना आता मेंदू धुतला तरी आयुष्यभर विसरणार नाही अशा ओळींची आठवण झाली.
"लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावी झाला. "
माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या या ऐतिहासिक वाक्यातल्या ऐतिहासिक गावाला आम्ही भेट दिली. या भेटीत मला काही गोष्टींचा अतिभयंकर आनंद झाला. एक म्हणजे शिक्षकांनी किंवा आईबाबांनी लिहून दिलेलं भाषण तस्संच्या तस्सं पाठ करण्याशिवाय त्याबाबतीत काहीही कळत नसलेल्या वयात ज्या गोष्टी मुखातून बाहेर पडल्या, ज्या गोष्टी अभ्यासात शिकले त्यातल्या महान व्यक्तींना जरी भेटण्याची तीळमात्र शक्यता नसली तरी निदान माझ्यासाठी फक्त फुलस्केप च्या नकाशावर वसणा-या या चिखली गावाला फुलस्केपबाहेर बघता आलं. दुसरी म्हणजे रिलीज़ झाल्या झाल्या लोकमान्य बघायचा बेत असताना त्याआधी प्रत्यक्ष चिखलीला जाता आलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही-
दाभोळचं चामुंडामाता मंदिर बघायला आम्ही निघालो होतो. मुंबई ठाणे आणि उपनगरात माणसांचे बुचकेच्या बुचके बघायला मिळणा-या आम्हाला ते ब-यापैकी सामसूम रस्ते खात होते. लांबच लांब रस्ता, त्यावर धावणारी चारचाकी गाडी, आतमधली डोकी रेडिओ ऐकतायत आणि बाकी जगात कोणीच नाही असं काहीसं वाटत होतं. तितक्यात मुख्य रस्त्याला उजवीकडे एक फाटा फुटला. बोर्ड होता-
"लोकमान्य टिळक स्मारक"
बाबांनी खच्चकन ब्रेक दाबला. काहीएक बोलणं नं होता एकमेकांची सहमती एकमेंकांना कळली आणि आम्ही उजवीकडे वळालो. खूप उत्सुकता होती ते स्मारक पहायची (आणि फुलस्केपवरचं गाव प्रत्यक्षात पहायची) जिथे जिथे टिळकांवर भाषण दिलं ते सगळे क्षण डोळ्यासमोर नाचत होते. मनात कुठेतरी 'मी इतिहासाला भेटायला जातेय' असं सारखं वाटत होतं. पुढे रस्त्याच्या बरोब्बर मध्यात अजून दोन फाटे फुटले. इथे मात्र कुठलाच बोर्ड नव्हता. स्मारक किती लांब आणि कुठल्या दिशेला आहे हे समजायला काहीच मार्ग नव्हता. मग दोन्ही रस्त्यांनी जाऊन पहायचं ठरवलं. पहिल्यांदा डावीकडे निघालो. परत एवढ्या मोठ्ठ्या जगात फक्त आम्ही तिघं उंडारतोय अशी भावना दाटून आली. तितक्यात आम्ही एकटे नाही असा पुरावा देणारं एक वसतीगृह आलं. वसतीगृहाच्या आधी किंवा नंतर, आजुला किंवा बाजूला रस्त्याशिवाय काहीच नव्हतं. रविवार होता. मुलं खेळंत होती. रस्ता विचारायचा म्हणून आम्ही थांबलो आणि त्यांनी क्षणार्धात आम्हाला घेरलं. "एवढ्याऽ मोठ्ठ्या जगात आमच्याशिवायही कोणीतरी जिवंत आहे " हाच आनंद त्यांच्याही चेह-यावर झळकलेला स्पष्ट दिसला. त्यांच्याशी बोलल्यावर आम्ही जात होतो तो रस्ता योग्य आहे याची पुष्टी झाली आणि आम्ही त्यांना धन्यवाद, टाटा वगैरे करून निघालो. बराचवेळ काहीच लागलं नाही. मग अधेमधे एक दोन घरं दिसायला लागली. गुगलमॅपच्या बाईंनी चिखली असा भाग दाखवला आणि आम्हाला कोण आनंद झाला म्हणून सांगू ! अजून फास्ट पुढे जात राहिलो, जात राहिलो, जात राहिलो आणि एका टपरीपाशी रस्ता संपला. डावीकडे एक वळण होतं पण परत कुठलाच बोर्ड नव्हता. विशेष म्हणजे त्या टपरीतही कोणी नव्हतं ! (कसं कोणी पुड्यापाड्यांनी, वेफरपाकिटांनी भरलेली टपरी उघडी टाकून जाऊ शकतं?? ) मग तिथेच गाडी लावली. उतरलो, तिघांनी तिन दिशांना नजरा फिरवल्या आणि एक बोर्ड दिसला.
'लोकमान्य टिळक मंदिर'

त्यासोबत एक बाणही होता. ज्या दिशेला बाण दाखवला होता त्यादिशेला एक फाटक होतं ज्याला कडी लावलेली होती. ते इतकं गंजलं होतं की किती वर्ष याला कोणी हात लावला नसेल याचा अंदाज आला नाही. थोडा वेळ आम्हाला बघुन आजुबाजूच्या नारळाच्या झाडातून एखादा तरी माणूस येईल असं वाटलं. आम्ही प्रामाणिकपणे वाट पाहिली. पण कोणीच आलं नाही. मग आम्ही गेट उघडलं. गंजलेलं लोखंड थोडं हाताला लागलं. त्या भयाण शांततेत त्या गेट चा एवढ्याने आवाज झाला की दोन मिनीट दचकून आम्ही परत कोणी येतंय का याची वाट पाहिली. कोणीही आलं नाही मग आम्ही ठरवलं. जितकी दारं उघडावी लागतील, तितकी उघडायची पण स्मारक बघायचंच ! हो तर ! टिळकांचं स्मारक बघणं हा आमच्या जन्मसिद्ध् हक्क होता आणि तो आम्ही मिळवलाच !
गेट उघडून पाय-या उतरून खाली गेलो. एक मोठी खोली होती. फार मोठी नाही, फार छोटी नाही अशी. तिलाही कडी लावलेली होती. ठरवल्याप्रमाणे तीही उघडली. आत गेलो. थोडं पुढे जाऊन मुख्य गाभारा होता. त्यालाही दार. या दाराला मात्र कुलूप होतं. त्या दाराआड टिळकांची भव्य मूर्ती होती. त्याऽ मुख्य रस्त्यापासून जे आम्ही स्मारक स्मारक म्हणून नाचत होतो तेच हे स्मारक. स्मारक म्हणजे नक्की काय असेल याचं स्पष्ट असं चित्र जरी डोक्यात नव्हतं तरी एका खोलीत एक कुलूपबंद मूर्ती इतकीच स्मारकाची व्याख्या माझ्यासाठी नविन होती. फारच मोठा भ्रमनिरास झाला. त्या खोलीत अजून काही होतं तर चे म्हणजे फळे ! भिंतींना काळा रंग देऊन त्यावर टिळकांचे विचार लिहीलेले होते. कुठलीही सूचना नं लिहीलेली दिसल्याने यासगळ्याचे फोटो काढले. पण खोलीभर नजर फिरवल्यावर जाणवलं की कुठेही जाळेजळमट नव्हते. म्हणजे कोणीतरी टिळकांची आणि खोलीची काळजी घेत होतं. ते पाहून जरा बरं वाटलं. आलो तसंच परत निघालो. उघडलेली सगळी दारं, कड्या लावल्या आणि गाडीपाशी आलो. तोवर टपरीचा मालक परतला होता. त्याला "काका तीन चहा द्या " सांगून आम्ही त्या 'स्मारका'कडे बघत उभे राहिलो. मग अचानक हसू आलं. टिळक 'लोकमान्य' होते. मग त्यांच्यावर किंवा त्यांच्या स्मारकावर हक्क सांगणारं कोणी असावं, ते दाखवणारं, त्यांच्याबद्दल सांगणारं कोणी असावं हे का मनात आलं ? प्रत्येक मंदिरात बसलेल्या भटजी/पुजा-यांनी आपली मती ताब्यात घेऊन तिला व्यवहाराचे चांगले ध़डे शिकवलेत हे लक्षात आलं.
बाकी काहीही असो, ★'लोकमान्य' तुमचे आहेत. या, बघा, वाचा, फिरा, जा★ ही शुद्ध विचारसरणी आणि पद्धत मला फार आवडली.
अदिती
१६ जानेवारी २०१५






Comments
Post a Comment