कविता- आंगणवेडी

ती रूसलेली तो जाताना
हिरमुसलेली..तो नसताना
अनाथ अश्रू ओघळताना
उगा आंधळी सोबत करती
घमघमणारी, दव न्हालेली
फुले बहरती आंगणवेडी
ती ही थोडी आंगणवेडी
...
आठवपक्षी येती जाती
उगाच वाढत जाते वर्दळ
जुन्याच विश्वामधे बिचारी
एकएकटी चालत जाते
कंठी काही दाटून येते
फुटेल आता बांध कधीही
तरी हुंदके मनी लपवते
एकएकटी पुन्हा परतते
या दुःखाची, आठवणींची
घट्ट जखडते, दुष्टच बेडी
पुन्हा आंधळी फुले उराशी
पुन्हा बिचारी आंगणवेडी


अदिती कापडी
४ मे २०१५

Comments