सकाळी सकाळी उठताना "आज गाडीत नक्की झोपायचं" असं कितीही ठरवलं तरी ट्रेनमधे बसेपर्यंत हे सगळे निर्णय काही मा
ज्याबरोबर लोकलीत चझत नाहीत. (ब-याचदा आमची म.रे.च झोप उडवते ! ) आणि इतर वेळी उत्साहात तरंगणा-या बायका. कितीचीही ट्रेन पकडा, या बायका कध्धी म्हणजे कध्धीच आळसावलेल्या सापडणार नाहीत. ऊर्जेचा स्वतःचा साठाच असतो जणू यांच्याकडे ! या उसळणा-या चैतन्याचे साधारण प्री-बोर्डींग आणि पोस्ट-बोर्डीग असं वर्गीकरण केलं जाऊ शकतं.
प्री-बोर्डींग
स्टेशनला पोहोचल्या-पोहोचल्याच एकमेकींशी हाय हॅलो सुरू होतं . नव-याला आणि मुलांना तयारी करून देऊन (ऑफिस आणि शाळेच्या) लढाईवर पाठवून स्वतःसुद्धा स्वतःच्या लढाईसाठी आवरून घाईघाईत स्टेशनवर येतात आणि आल्या आल्या तिथल्या पंख्याखाली उभ्या रहातात. हाश-हूश करत, घाम पुसत, केस झटकत त्यांचा खरा दिवस सुरू होतो. तोवर एक दोन मैत्रिणी भेटतातच, मग "आज फार घाई झाली गं", "अगंऽऽ गॅसच संपला ऐन वेळेवर, हे झोपले होते मस्त.. नुसती धावपळ झाली आज" वगैरे वगैरे सुरू होतं. मग थोडं उकडणं कमी झालं की प्लॅटफॉर्मच्या कडेला आपापल्या जागेवर येऊन उभ्या राहतात. तरीही ओढणी/रूमाल फिरवत हवा घेणं चालूच असतं आणि अखंड बडबडंही ! तेवढ्यात थोडी पुढे उभी असणारी एखादी मैत्रिण "ए आली आली", "ए आली गं, ओढणी घे पुढे", "ए शी यार जुनी लोकल आहे आज" वगैरे म्हणते आणि ट्रेन स्टेशनमधे आल्याचं यांना कळतं. मग सगळ्या एकदम ऑन युवर मार्क सारख्या तयार होतात. केस पुढे घेणे, ओढण्या पुढे घेऊन पोटापाशी तिची गाठ मारणे, पर्स खांद्यात एकदम घट्ट पकडणे, इत्यादी हालचालींचा यात समावेश होतो. (काही जणी तर पर्स थेट गळ्यात अडकवतात(स्वतःच्या!)). आपापली रोजची सीट (विंडोसीट असेल तर विचारूच नका) मिळवण्यासाठी यांची युद्धपातळीवर तयारी सुरू असते! जीवन मरणाचा प्रश्न असतो शेवटी ! जशीजशी ट्रेन जवळ येते तसंतसं यांचं रिपोझिशनींग सुरू होतं. त्याचबरोबर "काय यार नाटकंएत या मोटरमन ची", "ए कसली फास्ट आणलीय आज, मागे सरक थोडी", "याला थांबवायची नाहीये का गाडी आज इथे" अशी रनींग कॉमेंट्री पण चालू होते. Multitasking you know ! या सगळ्यांत त्या मोटरमन ला रिक्षा/टॅक्सी थाांबवतात तसा हात करायलाही कमी करत नाहीत. पण कितीही काही झालं तरी बरोब्बर रोजचं ठरलेलं डोअर पकडतात, (रोज ठरलेलं डोअर पकडणे, मुळात डोअर पकडणे हेच भयंकर कौशल्याचं काम आहे. तर ते असो.)आणि आत घुसून स्थानपन्न होतात. मग त्यांच्या चेह-यावरचा आनंद पहायचा ! अगदी मॅरेथॉन जिंकल्यासारखा ! (ते ही रोज) . गाडी थांबेपर्यंत यासगळ्या मस्त सेटल झालेल्या असतात आत ! जर हे दृश्य एखाद्या दाद-यावरून पाहिलं तर मुंग्याचं वारूळ फुटून पळणा-या मुंग्या आठवतील. मग सुरू होतात पोस्ट-बोर्डींग अॅक्टीविटीज...
पोस्ट-बोर्डींग
एका मागून एक फटाफट चढलेल्या, आल्यापासून बडबड करत असलेल्या सगळ्या मग हक्काच्या जागी टेकतात. जोवर एखादी नवी बाई चढताना गडबड करत नाही किंवा त्यांच्या जागेवर बसत नाही किंवा एखादी बाई डाऊन करून येऊन जागा हडप करत नाही तोवर यांचं चांगलं चालू असतं( डाऊन करून येणं हा अक्षम्य गुन्हा आहे). जर अशी कोणी सापडलीच तर मग सगळ्याजणी मिळून तुटून पडतात तिच्यावर. ब-याचदा ती अपराधी स्त्री मराठीच असते तरी ह्या आपल्या जगप्रसिद्ध अर्धवट बंबैय्या हिंदी (की मिंदी ?) मधे तिला झापतात. ज्यांचा या प्रसंगाशी काही संबंधही नसेल त्याही यात सामिल होतात (आणि त्या बिचाऱ्या अबलेला कोपच्यात घेतलं जातं.) मग हा विषय दिवसभरासाठी पुरतो. असं काही नाही झालं तर इतर विषय असतातंच ! जसं कीऽऽ... अं.. माझी सासू कशी वागते, मी तिला कसा धडा शिकवते (इन शॉर्ट- मी तिला कसं वागवते ), नवरा कसा वाढदिवस विसरला, मुलं कशी ऐकत नाहीत, शाळांची प्रोजेक्ट बिजेक्ट कशी नाटकं असतात, मी कसं कधी किती कुठे काय शॉपिंग केलं, तुझ्यापेक्षा कसं स्वस्तात मिळवलं, मी बार्गेनिंग करण्यात कशी सराईत आहे, कामवाली बाई कशी काम करते, आज ही (मैत्रिण ) का नाही आली, इत्यादी इत्यादी.. (गाडी केव्हाच सुरू झालेली असते). यानंतरचा (किंवा या गप्पांच्या मधला ) विषय म्हणजे पुढच्या स्टेशनवरच्या मैत्रिणींना चढताना बघणे. (यांच्यासारखीच तीसुद्धा तिची डोअर पकडण्याची गणितं चुकवणार नसतेच ) तरी या खिडकीत बसल्या-बसल्या तिला "ए चढ पटकन", "इकडे ये इकडे ये", "ये गं पटकन, सीट आहे इकडे, वगैरे म्हणून प्रोत्साहीत करतात. मग ती मैत्रिण आली की (मनातून इच्छा नसतानाही फॉर्मॅलिटी म्हणून ) तिची पर्स घेण्याची अॅक्टींग करतात. मग ती " नाही नाही" म्हणत पर्स वरती माळ्यावर (हो, हा रेल्वेमधला माळाच झाला. ) टाकते. चुकून हिचे भाव न समजता तिने पर्स हातात दिलीच तर नाकं मुरडत धरतात, मग काय !
पुढे ह्या उभ्या असणा-या मैत्रिणींना "बस अमुक स्टेशन येईपर्यंत" असं सांगतात आणि जागा देतात. (पैकी 80 टक्क्यांच्या मनात 'म्हणजे आपण नंतर झोपायला मोकळं !' असाच भाव असतो. याप्रसंगावरून कविता महाजनांची 'भिन्न' आठवली. या सगळ्या प्रसंगांचं त्यांनी अगदी अचूऽक वर्णन केलंय. ) अशी सीट बहाल केल्यावरही सीटवरच डोळा असतो, "कधी हे स्टेशन येईल" "बसायला दिलं तर बसलीच" असे मनाचे श्लोकही चालूच असतात. जेव्हा ती मैत्रिण उठते तेव्हा मात्र यांना खूप आनंद होतो. "आता झोपायला मिळणार" ही जाणिव खरंच खूप सुंदर असते हो, काय सांगायचं आता!
अश्या प्रकारे सकाळी उठल्यापासून सुरू असलेली तोंडाची फास्ट लोकल शेवटी कारशेड मधे जाते आणि रोजच्यासारख्या त्या उत्साहाने खळखळ वाहणा-या बायका झोपी जातात.
(तोवर माझं स्टेशन येतं आणि माझी झोप राहूनच जाते तशीच.)
(चित्राभार- गुगल चित्र)
(चित्राभार- गुगल चित्र)
अदिती कापडी.
१५ जुले २०१५
बदलापूर.
१५ जुले २०१५
बदलापूर.
Comments
Post a Comment