बॅगुलबुवा

आपण प्रवास करत असलेलं अंतर आणि आपण नेत असलेल्या बॅगचा आकार यांचं प्रमाण कधीच व्यस्त नसतं. तसंच त्या प्रवासासाठीच्या आपल्या गरजाही ! अंतर वाढलं की गरजा आणि परिणाम म्हणून बॅगचा आकारही 'वाढता वाढता वाढे' होतो. जसं की,

१. जी जागा मिळवण्यासाठी गाडी थांबण्याआधीच तुम्ही 'जंप' करता, ती जागा स्वच्छ हवी ना ? स्पेशली आता पावसाळ्यात. खिडकीतून आत येणा-या पावसाच्या धारांनी सीट भिजवल्यावर पुसणार कशाने !  त्यासाठी टिश्यू पेपर किंवा एक वेगळा रूमाल !
(भलेही आम्ही संत्रं, शेंगा, 'टाईमपास' खाऊन त्याची सालं, टरफलं, पाकिटं डब्ब्यातंच फेकू ! पण सीट कशी कोरडीखट्टं, स्वच्छ, टकाटक पाहिजे. काय !)

२. इकडची खिडकी, तिकडची खिडकी, पुढचं डोअर, मागचं डोअर इथून येणा-या जोरदार हवेपासून वेगवेगळ्या स्टाईली केलेले केस कसे जपणार ? स्कार्फ ! गाडी सुरू झाली की थोडावेळ मस्त सिनेमाचं शुटिंग होत असल्यासारखे केस उडू दिले जातात. मग नंतर बाहेर निघतो तो स्कार्फ ! केसांच्या नावाखाली जमेल त्या पद्धतीने डोळे सोडून बाकीच्या चेह-याची मुस्कटदाबी करायला (काहीजणी हे असे आतंकवादी मार्ग सोडून साध्या पद्दतीनेही बांधतात हो स्कार्फ !) हे साधन लागतं.


३. फावल्या वेळात (म्हणजे प्रवासातंच ) तोंड चालू ठेवायला (आता म्हणाल ते तर चालूच असतं..तर तसं नाही) म्हणजे खायला लागणार ना काहीतरी ! टाईमपास ! वेफर्स, चिवडा, फळं, शेजवान चकल्या, डाएट चिवडा, बिस्कीटं, सुकामेवा.. बरंच काही काही असलेले एक्स्ट्रॉ डबे बरोबर बाळगले जातात.
आणि असं बरंच काही ती बॅग सामावून घेत असते. मग ती मोठी नको ? इवलीशी, सस्या-मांजराचं तोंड असलेली, हलकीफुलकी बॅग कशी हो चालेल ?? त्यासाठी भरभक्कम आणि धडधाकटंच बॅग लागते.

(चित्राभार- गुगल चित्र)

अदिती कापडी.
१७ ऑगस्ट २०१५

Comments