हंपी आणि मंत्रालयमची सहल

कर्नाटक आणि आंध्रातली दोन तीन ठिकाणं फिरले. परतल्यावरचा खोपोली ते बदलापूर हा भाग सोडला तर संपूर्ण प्रवास त्या त्या ठिकाणच्या रेल्वे, बस, रिक्षेने आणि काही ठिकाणी चालत केला. तीन-चार दिवसांत घडलेले काही प्रसंग आणि त्यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवलेल्या काही गोष्टी-
१. स्वच्छता-
'हा महाराष्ट्र नाही' हे अगदी लग्गेच जाणवण्याइतपत स्वच्छता.
रेल्वेतून बाहेर बघतानाच ही प्रचिती आली. रेल्वेस्टेशनं नको तेवढी स्वच्छ! मुंबई , (नाशिक, पुणे, जळगाव आणि इतरही बरीच) स्टेशनं बघितलेल्या माणसाला 'स्टेशन इतकं स्वच्छ असतं का? ', ' स्टेशन काय स्वच्छ ठेवायची जागा असते का? ', 'छे छे ' वगैरे प्रश्न नक्कीच पडतील. आता यात माणसांचा तिथे किती प्रमाणावर वावर असतो, किती वेळाने असतो, कशासाठी असतो , इत्यादी बाजू तपासायच्या का, किंवा का तपासायच्या हा मुद्दा आहेच. तरी.. स्टेशनवर ठेवलेल्या कचरापेट्यांच्या भोवती ना कचरा होता, ना तंबाखूच्या लाल रंगाच्या नक्ष्या. कचरापेटीचा रंग पालटला नव्हता, मूळ रंग दिसत होता. बेसिन्स तुंबलेले नव्हते.
स्टेशन, बसस्टँड, ढाबे, पर्यटन स्थळ, आणि रस्त्यावरची सार्वजनिक शौचालयं कमालीची स्वच्छ होती. कुठेही घाण वासाने गुदमरून मरायची वेळ आली नाही. तिकडेही पाच-पाच रूपये घेतले गेलेच पण बदल्यात तशी सुविधा मिळत होती. ज्या ज्या ठिकाणी शौचालयं वापरली तिथे कुठलीच बाई बादलीभर पाणी टाकल्याशिवाय बाहेर आली नाही. तिथे ठेवलेल्या बादल्याही चांगल्या अवस्थेत होत्या.
रस्तेसुद्धा स्वच्छ होते. मंदिरं, पर्यटन स्थळंसुद्धा स्वच्छ होती.
(मंत्रालयम (आंध्र) च्या बसस्टँडवर सकाळी सव्वा सहा ते सात असा पाऊण तास होतो. तिथला स्वच्छतेचा अनुभव पुढच्या एका मुद्द्यात सांगण्यासारखा आहे.)
२. नखशिखांत न ताडणारी मुलं, पुरूष
मैत्रिण तन्मयाच्या पिंक सिनेमाबद्दलच्या का कोणत्याश्या लेखाची आठवण आली. मुंबईचीही आठवण आली. अनेक अनोळखी चेहरे, आणि वाईट नजरा आठवल्या. समोरून येणाऱ्या मुलीला, स्त्रीला ती येईपर्यंत आणि पुढे गेल्यावर दिसेनाशी होईपर्यंत खालून वर आणि वरून खाली अक्षरशः 'स्कॅन' करणारी मंडळी 'क्कुठ्ठेच्च' भेटली नाऽहीऽ. इतकं मोकळं आणि स्वतंत्र आजवर मला कोणत्याच ठिकाणी वाटलेलं नाही.
३. शहाळं, फळांच्या गाड्या आणि गर्दी
मंत्रालयममधे एक सोडली तर तिथे आणि नंतर होस्पेटमधे आम्ही वावरलो त्या परिसरात एकही भेळपुरी, पाणीपुरीची गाडी दिसली नाही. जिकडे तिकडे शहाळं, टरबूज आणि बोरं विकणाऱ्या गाड्या होत्या. तिथे शाळा, कॉलेजं सुटल्यावर मुलामुलींची गर्दी झाली होती, जी आपल्याकडे (so called) चायनीज (!) भेळ, मंचुरियन, भेळ पाणपुरीच्या गाड्यांवर दिसते. (ह्या गाड्या तिकडे असत्या तर तिथेही गर्दी झाली असती कदाचित)
बाकी, मंत्रालयममधे लोकांना हिंदी येत नाही (खूप्पच कमी लोकांना येतं) तरी ती एक पाणीपुरीची गाडी मात्र होती.
४. गोबी.
इथे मंचुरियनला गोबी नावाने संबोधतात. एका उडपी हॉटेलात या नावावर बराच वेळ विचार केल्यावर शेवटी विचारलं तेव्हा त्याने मंचुरियन थेट समोर आणूनच ठेवले आणि ते खायला टुथपिक दिल्या! तो मेन्यू असा होता-
Idli wada
Upma wada
Sada dosa
Ghee Masala dosa
Gobi
chaw chaw bath
गोबी उलगडल्यानंतर त्या 'चाव चाव बाथ' कडे काही आम्ही वळलो नाही. ते भात होतं की बाथ होतं हे कळत नव्हतं आणि विचारायची सोय नाही, थेट समोर आणून ठेवलं असतं (किंवा बाथ असती तर आम्हाला कुठेतरी नेलं असतं! ). असो.
५. सुस्थितली, आरामदायी आणि छान रंगसंगती असलेली स्वच्छ बससेवा-
तो वरती स्वच्छतेत राहिलेला किस्सा-
सकाळी पाऊण तास मंत्रालयमच्या बसस्टँडवर होतो, पण बस ही एक गोष्ट सोडली तर ते बसस्टँड आहे हे पटवून देणारं दुसरं काहीही सापडलं नाही. कारण- मला समजलेलं बसस्टँड म्हणजे- अत्यंत घण वास, दणादणा आपटून हाडं खिळखिळी करणाऱ्या बशी, तंबाखू, पानमसाल्याच्या पुड्या, थुंकलेलं शोषून शोषून लाल झालेली माती/जमिन, प्रचंड धूळ, घाणेरडी, अस्वच्छ शौचालयं, आवळासुपारी, लिमलेटच्या गोळ्या, मासिकं विकणारी माणसं, रसवंत्या, माजलेले-दादागिरी करणारे, धड चालू न देणारे रिक्षावाले, भटकणारे कुत्रे, (कधीकधी गायी म्हशी सुद्धा) ..वगैरे वगैरे..
तर.. तिथल्या खुर्च्या स्वच्छ! कँटीन स्वच्छ! भिरभिरणाऱ्या माश्या नव्हत्या. सफाई कर्मचारी निमूटपणे नेमून दिलेली कामं कामचुकारपणा न करता करत होती.
येणाऱ्या प्रत्येक बसची सफाई होत होती. आतली सफाई स्टँडवरचे कर्मचारी करत होते. बाहेरची सफाई जसं काचा पुसणे वगैरे हे ड्रायव्हर करत होता. तिथल्या लोकांना/प्रवाशांना याची सवय होती. बस आली की ती आधी स्वच्छ केली जाते मग आपण बसायचं हे त्यांना ठाऊक होतं. एक म्हातारे आजी आजोबा कन्नडमधे (बहुतेक) काहीतरी बोलत होते त्यावरून त्यांना आसपासच्या एका गावाला जायचं होतं ते समजलं. मग पुढे एक बस आली त्या कंडक्टरशी ते बोलले. त्यावरून ती बस त्यांना हवं त्या गावी जात होती हे समजलं. पुढे ते आजीआजोबा येऊन खुर्चीत बसले. आपल्याला हवी ती बस लागली असतानाही ते परत का येऊन बसले हे समजलं नाही. नंतर केव्हातरी ते उठून बसमधे बसले होते. तोपर्यंत या बससफाईकडे एवढं लक्ष गेलं नव्हतं. नंतर बल्लरी (Bellary) ची बस लागली, जी अर्थातच आम्हाला समजली नाही कारण कोणत्याही बसवर हिंदी/इंग्रजीत पाट्या नव्हत्या. कंडक्टर 'बलारी बलारी ' ओरडत खाली उतरला तेव्हा हे समजलं. आम्ही बसकडे जायला लागलो तर कंडक्टर कानडीत (पुन्हा- बहुतेक) काहीतरी बडबडला. तरीही आम्ही पुढे जातोच आहोत हे पाहून तो समोर येऊन तेच बडबडला. एक मिनीट आम्ही एकमेकांकडे पाहून त्याला "हिंदी" एवढंच म्हणालो. मग त्याने "गाडी का क्लिनींग हो रहा. बाद मे बुलाता. " असं हसून सांगितलं. तेव्हा ही सगळी प्रक्रिया पाहिली. छान वाटलं. मग त्या कंडक्टरने बोलावल्यावर आम्ही जाऊन बसलो. तेव्हाही छानंच वाटलं 
तिकडचे रस्ते अगदीच खड्डेविरहीत नाहीत. पण आपल्यापेक्षा अतिशय चांगले रस्ते आहेत. जे काही मोजके छोटेमोठे खड्डे आहेत ते जाणवत नाहीत कारण बससेवा चांगली आहे. तिथल्या बसमधे बसल्यावर हाडांचा खुळखुळा होत नाही.
६. गणवेश
तिथल्या एका शाळेचा गणवेश- फिकट निळा शर्ट, त्यावर गडद निळा स्कर्ट किंवा फ्रॉक आणि वेण्यांना निऑन केशरी रिबिनी- असा आहे. त्या रिबिनी छान वाटल्या. निऑन निऑन 
७. हंपीतले गाईड
रवी नावाचा एक मराठी येणारा (शिकलेला) गाईड भेटला.
अर्थात हाच त्यांचा धंदा आहे त्यामुळे तिथल्याच काय इतर कुठल्याही ठिकाणच्या गाईड लोकांनी मराठी, हिंदीच काय, इतर विदेशी भाषा शिकणे सहाजिक आहे. पण या रवीची मातृभाषा कन्नड होती, आणि मग तो व्यवसायासाठी मराठी शिकला होता, असं असतानाही त्याने बोलताना 'माणूस भेटतो, वस्तू सापडतात/मिळतात' हा नियम मस्त सांभाळला. आमची मातृभाषा मराठीच असून आम्हाला मात्र वस्तू 'भेटतात' बरं का!
८. मंत्रालयम ते बल्लरी आणि बल्लरी ते होस्पेट या बसप्रवासात लागणाऱ्या छोट्या छोट्या गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी आंबेडकर चौक आणि बाबासाहेबांचे रंगीत पुतळे दिसले. एके ठिकाणी भगतसिंग चौक सुद्धा होता. त्या पाटीवर इंग्रजीतही लिहीलं होतं.
९. हिंदी/इंग्रजी वर्ज्य
होस्पेट तसं मोठं शहर आहे, आणि हंपी फिरायला येणारे इथेच उतरतात, त्यामुळे इथली (निदान पर्यटनसंबधीत व्यवसायातली) लोकं हिंदी/इंग्रजी बोलतात. मंत्रालयममधे कानडी, तेलगू, मल्याळी येत नसेल तर हाल आहेत. खरंतर मज्जा आहे. हातवारे करून, किंवा हिंदी/इंग्रजीतला साधारण माहिती असणारा शब्द सांगत सांगत तुटक तुटक "ओळखा बरं मी काय बोलतोय? " हा खेळ खेळत संवाद साधणे ही गंमत आहे.
१०. प्रदुषण
मंत्रालयममधे ठिके, लोकसंख्याच कमी आहे, म्हणजे गाड्याही कमी आहेत त्यामुळे तिथे प्रदुषण कमी असणं अपेक्षित होतं. पण संपूर्ण प्रवासातच अत्यंत कमी प्रदुषण आहे हे जाणवलं.
११. पदार्थ आणि चवी
आपलं माटुंग्याचं रामाश्रय (आहाहा! ) किंवा कुठेही (हॉटेल किंवा स्टॉलवर) मिळणारे दक्षिणी पदार्थ बेस्ट. तिथे खाल्ले ते कोणतेच डोसे, इडल्या, वडे आवडले नाही. दोन वेळा पंजाबी भाज्या मिळणाऱ्या हॉटेलमधे गेलो, त्यापैकी एकदा आईने manchou soup (हे ही तिथेच लिहीलं होतं) घेतलं, तर ते आल्यावर दोन मिनीटं 'याने सांबार आणून दिला की काय' अशी भिती वाटली!!
बाकी,
भाषा येत नसतानाही लोकांनी व्यवहार व्यवस्थित सांभाळतात. कानडीत किंमत सांगून समजत नाही म्हटल्यावर किती पैसे द्यायचे हे नोटा किंवा कॉईन दाखवून समजावतात,
सगळीकडे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फक्त कापूस आणि लाल मिरच्या,
आणि
होस्पेटच्या बसस्टँडवर तिथलं कँटीन सोडलं तर कुठेच चहा मिळत नाही! बदाम मिल्क, लेमन टी मिळतो पण चहा नाही. चक्क !! चहा! नाही!
बुरा है यह !


अदिती
२९ डिसेबंर २०१६

Comments