कविता- मी तशी खरेतर कधी झोपले नाही

मी तशी खरेतर कधी झोपले नाही,
ह्रदयात नेहमी धडधड चालू असते
वरकरणी दिसती मिटलेले डोळे, पण
डोक्यात कल्पना कधीच झोपत नसते.
हे अविरत चालू आहे चक्र कशाचे?
मी सापडले का कुणास? कोणी सांगा
मी मुकले आहे दृष्टीलाच स्वतःच्या,
की खेळ खेळती काळ्या प्रकाशरांगा!
मी पाठपुरावा केला असता माझा,
पण वळल्यावरती कोरी पाटी दिसते..
ना अस्तित्वाची कुठे निशाणी आता,
ना संदर्भांनी गजबजलेले रस्ते..

अदिती
२७ जानेवारी २०१७

Comments