मृण्मयी रानडेंच्या एका पोस्टने किती काहीकाही आठवलं बाप रे!
*पाच * वर्ष सातत्याने *बदलापूरपासून* *मध्यरेल्वेने* शिव्या घालत घालत प्रवास केल्यावर आता या रगाड्यातून मुक्ती मिळाली काही वर्षांसाठी तर आठवण येतेय सगळ्याची. बावळटपणाच. खरं सांगायचं तर लळा लागला लोकल, मुंबई, आणि उपनगरांचा.
तर.. सर्वात जास्त शिव्या पावसाळ्यात घातल्यायत मरेला. अंघोळ न करता बाहेर पडलं तरी चालायचं. (मी तसं केलं नाही हो कधी ). आपण, आपले कपडे, आपली बॅग, रिक्षेतलं सीट, स्टेशन, लोकल, लोकलमधल्या सीट..सगळंच सतत ओलं. सत्तत! म्हणजे पावसाळ्याशी दोन हात करायची वेगळी तयारी करावी लागायची. ह्याचं काही लोकलने वावरण्यासाठीचं वेगळं ट्रेनिंग दिलं जातं असं नाही. अनुभव सगळा. तुम्ही 'किती पावसाळे पाहिलेत? ' ही म्हण शब्दशः लागू होते याबाबतीत.
१. एकतर सर्वात आधी बॅग बदलायची . नाहीतर आपला सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा सगळा संसार सामावून घेणारी बॅग (बॅग हा मुळातच वेगळा विषय आहे, तुम्ही हे वाचलंय का? वाचा ना..) पावसाचं पाणी सुद्धा आपलंसं करते. (मुंबईचाच गुणधर्म- सर्वसमावेशकता! ) , आणि ती बदलून झाल्यावरही पुन्हा रचताना कॅरीबॅगमधे सामान ठेवून रचा. रिस्क कशाला?
२. प्यायचं पाणी! शिवनेरीत मिळते ती छोटी बाटली नेली तरी पुरे. शक्य तितकं कमीच प्यायचं पाणी. लोकल हमखास खोळंबतात (ती* हमखास ठिकाणं पण सांगते) ,त्यात आपण भिजलेले असतो, बाहेर पाऊस कोसळत असतोच, आणि शू लागते ! बरं किती वेळाने लोकल सुरू होणार ह्याचा नेम नसतोच. त्यापेक्षा पाणी जमेल तितकं कमीच प्यायचं. रिस्क नकोऽ !
३. चपला !लोकलने जायचं असायचं त्यामुळे हील्स (मलबार किंवा अँटॉप नाही, सँडलच्या प्रकारातल्या) घ्यायचा कधी प्रश्नच आला नाही मनात. किटो किंवा सरळ बूट बेस्ट वाटायचे. आपण (म्हणजे आम्ही (म्हणजे मी) ) आधीच धडपडणारे प्राणी. काही कारण नसताना पण अडखळून पडतो कुठेही. त्यात आपल्याला चालत्या गाडीत (पावसाळ्यात नाssही) उड्या मारून जागा मिळवायची घाई. कुठे उंच टाचा बिचा घ्यायच्या. पाचही वर्ष किटोंवर, किंवा बूट वापरून काढली. मग यात पावसाळा आला की बूट माळयावर! ते बूट भिजतात, मग पाऊल टाकल्यावर गचंगचं लागून बोटाबोटातून बुटातलं पाण आतमधे खेळणार ! संपूर्ण वॉटरपार्क. नकोच. किटो बेस्ट.
४. कपडे !
कॉटनचे, जाड, सुती, बारीक-पातळ-everything_on_display वर्गातल्या कपड्यांना पावसाळ सुट्टी. सिंथेटीक-टेरिकॉटचे पाणी धरून न ठेवणारे कपडे पुन्हा वापरात. हलके फुलके. चुडीदार-पंजाबी-ओढणी वगैरे तर दूर-दूरपर्यंत कपाटात ठेवायचे नाही चार महिने. पांढरे, आणि लाईट रंगाचे पण नाही. कटाप.
कॉटनचे, जाड, सुती, बारीक-पातळ-everything_on_display वर्गातल्या कपड्यांना पावसाळ सुट्टी. सिंथेटीक-टेरिकॉटचे पाणी धरून न ठेवणारे कपडे पुन्हा वापरात. हलके फुलके. चुडीदार-पंजाबी-ओढणी वगैरे तर दूर-दूरपर्यंत कपाटात ठेवायचे नाही चार महिने. पांढरे, आणि लाईट रंगाचे पण नाही. कटाप.
५. एक मोठ्ठा नॅपकीन किंवा पेपर नेहमी बरोबर बाळगा. असं सिंहासन ऑफर झालं की मस्त पुसून-पासून swag मधे जाऊन बसायचं. आणि हो! पाऊस थांबल्यावर उघडलेल्या खिडक्या ट्रेनमधून उतरताना पाऊस येत नसेल "तरी" बंद करून जा, विशेषतः शेवटच्या स्टेशनांना उतरणाऱ्यांनी काळजी घ्या. कृपया. प्लीज.
बाकी, स्टाईल मारत पाऊस येत असेल तरी दाराशी उभ्या राहणाऱ्या हिरो-हिरोइनींनी आपली स्टाईल खिशात घालून घरी गॅलरीत सादर करावी.
अजून एक. नीट निरीक्षण केलं तर पावसाळ्यात पावसामुळे डब्यांची दारं लावावी लागत असल्याने इतर ऋतूंमधे सुज्ञ लोकांनी तंबाखू-मावा-चैनीखैनी-बिनीच्या थुंकून चितारलेल्या सुप्त नक्ष्या दिसतात. छान दिसतात. बघा.
आणि शेवटी. एवढी सगळी धडपड आपण संध्याकाळी/रात्री घरी जाण्यासाठी करतो. तेव्हा जीवाशी चायना माल असल्यासारखं खेळणं बंद करा, आणि किमान पावसाळ्यात तरी चालत्या गाडीत चढणं, उतरणं, लटकणं थांबवा.
पावसाळ्याच्या शुभेच्छा लोकलकरांनो
☺
💗
*"ती" ठिकाणं-
म.रे. तशी कुठेही खोळंबते. पण त्यातल्या त्यात पाणी साचण्यात अग्रेसर असणारी स्टेशनं म्हणजे-
कल्याण
ठाणे
विक्रोळी-घाटकोपर
कुर्ला- सायन-माटुंगा (ह्या तीन स्टेशनांच्या तर टींब टींब टींब )
भायखळा.
म.रे. तशी कुठेही खोळंबते. पण त्यातल्या त्यात पाणी साचण्यात अग्रेसर असणारी स्टेशनं म्हणजे-
कल्याण
ठाणे
विक्रोळी-घाटकोपर
कुर्ला- सायन-माटुंगा (ह्या तीन स्टेशनांच्या तर टींब टींब टींब )
भायखळा.
आता खऱ्या शुभेच्छा.
अदिती.
१० जून १७
Comments
Post a Comment