रिंगण- मराठी चित्रपट

रिंगण.

"आवडला नाही", "समजलाच नाही", "किती मिळमिळीत! ही एवढी साधी गोष्ट बघायला गेलो होतो आम्ही इतकं तिकीट काढून थिएटरमधे? ", वगैरे वगैरे..
(ह्यातलं 'इतकं' तिकीट म्हणजे असा किती तोटा झालाय लोकांना हे कळलं नाही. मी जिथे पाहिला तिथे तिकीट १०० रुपये होतं. पण ते ३०० असतं तरी मी रिंगण पाहिलाच असता. असो. 'फेस्टिव्हल मुव्ही', 'अवॉर्ड मुव्ही' असणं हे त्या त्या कलाकृतीचं प्रयत्नोत्तर यश असतं. कलाकृती, इथे सिनेमा, तयार होताना/करताना त्यांना हे पुरस्कार मिळाले नसतात. आपल्या कलाकृतीला भरपूर यश, पुरस्कार मिळावे असं वाटणं चुकीचं नाहीच, पण ती तयार होताना आपलं काम अधिकाधिक चांगलं कसं होईल हाच एक ठळक उद्देश त्या संपूर्ण टीमचा असतो. त्यामुळे आपणही बघताना 'फेस्टिव्हल फिल्म' वगैरे पार्श्वभुमी, पूर्वग्रह, अपेक्षा, इत्यादी सगळं घरी ठेऊन मनाची कोरी पाटी घेऊन बघावं. नाहीतर त्या अपेक्षांशी तुलना होत रहाते. )

तर, मला रिंगण आवडला, समजला, पटला, भावला..सगळंच. (अर्थात मी कोणतीच अपेक्षा किंवा 'कसा असेल, काय असेल' असे कोणतेही अंदाज न बांधता बघायला गेले होते. ) प्रत्येक कलाकृतीतून काहीतरी बोध शोधणाऱ्या, हा सिनेमा न समजलेल्या मंडळींना असं सांगेन की ' देव काहीतरी चमत्कार करून आपली मदत करेल असा विचार न करता आपण काहीतरी प्रयत्न करावे, त्यात देव नक्की साथ देतो, यश देतो' असा बोध रिंगणमधून मिळतो. याशिवाय रिंगणमधे वास्तवच दाखवलंय जे तथाकथित 'twist-पे -twist' चित्रपटांसारखं नसून आपण जगतो त्या साध्यासुध्या गोंधळलेल्या आयुष्यासारखंच आहे. प्रत्येक कर्जबाजारी , गरीब, निराश शेतकरी आत्महत्या करतोच असं नाही हे सत्य आहे, पण आपल्याकडे कोण जगतंय यापेक्षा कोण मरतंय हे glorify करण्यात लोकांचा वेळ जातो आणि मनोरंजन होतं त्यामुळे 'कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो' इतकंच अंतिम सत्य असणाऱ्यांसाठी हा सिनेमा अपेक्षाभंग आहे. रिंगणमधला शेतकरीसुद्धा बायकोचं मरण, दुष्काळ,घर आणि जमिन गहाण रहाणं, सावकाराचा दबाव, पैशाचा अभाव या सगळ्या अडचणींनी ग्रासलेला आहे. त्यालाही आत्महत्येची स्वप्न पडतात. पण तो या परिस्थितीला तोंड देतो, मुर्तीत देव शोधण्यापेक्षा माणसांत, प्रयत्नांत देव शोधतो, स्वतःची श्रद्धा अबाधित ठेवत पडेल ते काम करून जिद्दीने पैसा कमवतो, आणि कर्ज फेडून स्वतःची जमिन आणि घर परत मिळवतो. त्यात त्याचा एकच पिशवीभरून असलेला संसार आणि गाडी चोरीला जाते. (ती पण परत मिळेल, चोर कुठेतरी दिसेल, मारामारी होईल असा विचार करणाऱ्यांसाठीसुद्धा मोठा अपेक्षाभंग आहे. आमचेही मोबाईल वगैरे लोकलमध्ये चोरीला गेले आहेत आणि ते पोलिसांत तक्रार करूनही परत मिळालेले नाहीत. हे वास्तव आहे आणि रिंगणमधे वास्तवच दाखवलं गेलं आहे. ) याही पलिकडे रिंगणमधे वडिल मुलाचं नातं दाखवलंय, निरागस मुलाच्या संकल्पना, संस्कार, भावविश्व दाखवलंय, किमती वाढवून कुंकू विकणाऱ्या दुकानाची मागची बाजू दाखवलीये, कुंकवाच्या दुकानमालकाची, निलेश आणि फारूकची माणुसकी दाखवलीये.
या एकूण गोष्टीचा आणि मधल्या प्रसंगांचा प्रेक्षकांच्या भावनांना हात घालून, खूप तमाशा करून दाखवता आला असता, पण ते अगदी ठरवून टाळल्याचं वेळोवेळी दिसतं. सतत झणझणीत बघायची सवय असलेल्या प्रेक्षकांना हाच सपकपणा पचला नाही कदाचित. ढॅणढॅण आणि नको तिथे संगीत नाही, चिघळलेले, विशेषणांनी लगडलेले दुःखद संवाद नाही, उगाच twist नाही. मुद्देसूद सिनेमा. गरज आहे तितकंच दाखवलं, ऐकवलं, आणि संपवला. पटकथा, संवाद, संगीत, अभिनय सगळंच उत्तम.
रिंगण आवडला.
११ जुलै १७
#Ringan

Comments