स्वैर

गरमागरम चहाचा कप एका हाताने धरला असल्यावर दुसऱ्या हाताने गच्च आवळला की लगेच चटका बसतो, आणि इतका जोरदार बसतो की तात्काळ हात दूर न्यावा लागतो. तोच हात जरा हळूवार कपाभोवती धरला तर चटका न बसता उब मिळते, आणि हात जरा जास्त वेळ रहातो. माणसांचंही तसंच असतं.
प्रत्येकाच्या एकांताच्या व्याख्या,  आणि विस्तार वेगवेगळे असतात. त्यांना आणि त्यांच्या एकांताला आवळून चालत नाही. आपण मर्यादा लादतोय असं वाटण्याच्याऐवजी मिठी मारतोय असं वाटलं की माणूस सुसह्य होतो. माणसाला त्याच्यापेक्षा त्याचा एकांत जास्त प्रिय असतो. एखाद वेळी तो स्वतःवर निर्बंध सहन करेल, पण त्याच्या एकांतावर नाही. आपण समोरच्याला त्याचा एकांत काहीही हस्तक्षेप न करता देऊ केला की समोरचा आपोआप आपल्याला त्याच्या एकांतात सामावून घेतो. ती रेषा पार केल्यावर एक वेगळं जग सुरू होतं. तिथे आधीच काही विशिष्ट गोष्टी विशिष्ट जागी ठेवलेल्या असतात, आधीच काही माणसं एका ठराविक गतीने वावरत असतात. ते काहीही न हलवता, कशालाही धक्का न लावता आपण आपल्यापुरता जागा करून घ्यायची असते. भवताली कितीही मोकळी जागा दिसत असली तरी त्या सगळ्याचे तुम्ही मालक नसता. तुम्हाला आत प्रवेश मिळाला म्हणजे तुम्ही तिथले मालक झालात असं नसतं. एखाद्याचा एकांत भेदून आत जाण्याची पात्रता सिद्ध केल्याने गोष्टी संपत नाही तर सुरू होतात. अशा सुरू झालेल्या गोष्टींना मग शेवट नसतो..

Comments

Post a Comment