तो हळुहळू
पायऱ्या उतरू लागला. बिल्डींगीतून बाहेर आल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिलं. आता कोणत्या
दिशेने जायचं हे काही त्याला समजलं नाही. मग त्याने वर घराच्या गॅलरीकडे पाहिलं. तो
गॅलरीत उभा होता. याच्याचकडे बघत. संतापलेला.
मुठ आवळत. “लगेच चालता हो. सहन होत नाहीये मला ही गोष्ट” . मग तो त्याचा संताप
पाहून घाबरला आणि मुख्य रस्ता शोधत निघाला. बाहेर पडल्यावर गाड्या जात असलेल्या दिशेने
तो चालू लागला. थोडं पुढे गेल्यावर आणखी एका बिल्डींगमधून त्याला त्याच्यासारखाच अजून
एक निषेध बाहेर पडताना दिसला. याने त्याला हात करत आवाज दिला.
“काय रे,
तू पण जाहीर का?”
“हो..जाहीर.
आपलं कुठे त्यांच्यासारखं नशीब.. मालकांनी नोंदवलं की संपलं आपलं घरातलं वास्तव्य..पडायचं
बाहेर.”- त्याच बिल्डींगमधल्या एका घराकडे बोट दाखवत तो म्हणाला. मग दोघेही पुढे निघाले.
“पण काय रे..तू
नेमका कसलायस?”
”म्हणजे?”
“अरे म्हणजे
तुला कशाबद्दल नोंदवलंय”
“हां.. मला..ते
नाही का पंजाबमधे एका शाखाप्रमुखाची गोळी घालून हत्या केली..बसलो होतो रे चांगला निवांत.
तितक्यात या माणसाला फेसबुकवर ही बातमी समजली. एवढा संतापला, एवढा संतापला की हाकललंच
सरळ मला.”
“म्हणजे?
घरात वाद झाले?”
“नाही रे,
घरात बोलतंय का कोण कोणाशी? ती बातमी वाचली आणि याचा इतका सात्त्विक संताप झाला की
बास्स्स… शिव्या घालून ती बातमी शेअर करून याने जाहीर निषेध नोंदवला. ऑर्डर आली म्हटल्यावर
निघावं लागलं बाहेर. स्साला या आपल्या ‘जाहीर’ जातवाल्यांचे नुसते लागलेत.”
“अरे म्हणजे
तू संघवाल्या घराण्यातला का..”
“अरे नाही
रे नाही. पुरोगामी. पुरोगामीच. ”
“आयला मी
पण… माझ्या घरचे मला नोंदवताना म्हणाले की आम्ही या खुनाचा निषेध करतो. मी आता रस्त्यावर
असल्याने तो निषेध जाहीर होत हे सांगायला नको, क्काय ”. दोघे खळखळून हसले.
“अरे मग तुला
नोंदवलंय कशासाठी नेमकं?”
“अरे खून
नाही का झाला..खुनासाठी नोंदवलंय. माणूस भंग्याचा
गेला तरी खून तो खूनच ना..”
“असे घरचे
म्हणतात ना तुझे..”
“हाहाहाहा,
हो..”
“बरं मी निघालो
होतो आरामात, तर याने गॅलरीत येऊन आणखी उचकून सांगितलं लवकर जा असं.. जसं की..”
“नीट, खाली
बघ खड्डेयत, आपल्याला पुढच्या खड्ड्यात जायचंय, या नाही..”
“हां.. जसं
की आपल्याकडे कोणी लक्ष देणारेय..”
“होss..मागे
नाही का अजून खून झाले होते लोकांचे..कोण ते, त्यांचे मारेकरी अजून सापडले नाहीयेत
ते आणि इतरही..”
“हां हां..आलं
लक्षात. त्यांचं काय?”
“अरे तेव्हाही
हा भाई इतका संतापला होता की मला नुसती धाकधुक होती..आत्ता म्हणतोय की तेव्हा म्हणतोय..”
“Totally
understand that. मलाही खूप भिती वाटत होती. यांना काय अरे, नुसतं जाहीर निषेध असं
म्हटलं किंवा लिहिलं की झालं. तुटलं नातं. इतकी वर्ष आपल्याला पोसतात, माया लावतात..आणि
क्षणात परकं करून टाकतात. परकं म्हणजे किती परकं करावं!! जाहीर??? सरळ जाहीर निषेध करतात रे. घरातल्या घरात
करावा ना आजवर केला तसा. ”
“नको मनाला
लावून घेऊस. एव्हाना दुसऱ्या एखाद्या निषेधाने आपली जागा घेतलीही असेल. हे म्हणजे त्या
तिहेरी तलाक सारखं झालंय.. बोललं की झालं..”
तेवढ्यात
मागून आवाज आला-
“काय झालं
तिहेरी तलाकाचं??”
“काही नाही.
कायदा आला ना त्याविरोधात..”
“हो?? आला
ना. मला परवा एक निषेध सांगत होता की त्यावर बंदी घातली वगैरे. पण विश्वास वाटला नाही.
आजकाल किती अफवा पसरत असतात.”
“का एवढी
चौकशी पण? तुला त्या प्रकरणाने बेघर केलंय का..”
“हो ना यार.
काही कळत नाहीये काय करू आता. इतक्या तडकाफडकी मला नोंदवून, ते ही जाहीरपणे बरं का,
मोकळे झाले घरचे. आणि आता! आता ना घर का ना घाट का अशी परिस्थिती झालीये. जावं तरी
कुठे..”
“काय करतात
तुझ्या घरचे..I mean काय करायचे”
“पत्रकार
आहेत. ”
“अरे मग तू
रस्त्यावर काय करतोयस?? तू पेपरमधे हवास ना!”
“अरे त्यांनी
फेसबुकवर नोंदवलं मलाsss. पडावं लागलं बाहेर. माझ्या हातात होतं काss?”
“च् चिड्
चिडू नकोस रे. तुम्हा पत्रकारवाल्यांना निदान काहीतरी संरक्षण असतं. आम्ही बघा..भटके
विमुक्त.”
“हळू बोल
रे बाबा. आसपास कोणीतरी या जातीवादातलाही असेलच. येईल लगेच त्याचं रडगाणं ऐकवायला.”
“आपली लोकसंख्या
फार वाढलीये नाही हल्ली?”
“जाम. आजकाल
माणसं कमी आणि निषेधच जास्त दिसून येतात.”
“याचं भलतंच.”
“ए ते बघा.
आठवतंय का. इथला एक पुतळा रात्रीतून काढून फेकला होता म्हणे नाल्यात. आठवलं का”
“ए नाल्यात
नाही रे नदीत”
“अरे कुठे
का असेना. हेच ते ठिकाण. ”
“अच्छा हेच
का ते. टीव्हीवर पाहिलं होतं मी, पण प्रत्यक्षात नाही”
“तुला वाईट
वाटतंय का याचं? तुला तेव्हाच पब्लिक करायला हावा होता तुझ्या घरच्यांनी, तेव्हाच बाहेर
पडला असतास, दिसलं असतं ठिकाण..हाहाहाहा काय रे”
“अरे नशीब
बाबा तेव्हा नाही काढलं मला. किती निषेध होते त्या घटनेत. हे असं गलक्यात चालणं नाही आवडत मला. माझं स्वप्न
होतं..जेव्हा केव्हा मी हाकललो जाईन तेव्हा एकटाच बरा. ह्यांच्यासारखी झुंबड नको.”
“तू ढिम्मगड
रस्त्यावर राहिला नाहीयेस कधी, म्हणून इतकी डिमांड सांगतोयस. एव्हाना गुदमरून मेला
असतास.”
“अरे पण हे
काय करतायत त्या उद्यानाबाहेर?”
“अरे मंद
निषेधा..”
“हो बरोबर,
निषेध मंदच असतात.”
“नाही. ते
नोंदवणारे मंद असतात.”
“ए चूप. भांडताय
काय?? टीव्हीवर बोलावलंय का तुम्हाला?”
“टीव्हीवाल्यांना
पण सुरक्षितता असते..”
“अरे ए..इतके
काही वाईट हाल नसतात हां तुम्हा सामान्य माणसाच्यांचे..केव्हापासून ऐकतोय..काय लावलंय
सुरक्षितता सुरक्षितता. च्यायला, उद्या आमच्याचसाठीचे निषेध दिसतील रस्त्यावर, आम्हाला
गोळी घालून मारलं म्हणून”
“अरे हा सेंटी
झाला फार.. ए तलाकवाल्या. शांत हो. सॉरी”
“ह्म.. बरं
ही निषेध मंडळी तिथे उद्यानाबाहेर जमून काय करतायत ते समजलं नाहीच शेवटी..”
“ते ना, त्यांना
प्रत्यक्ष ते ठिकाण सापडलं ज्यासाठी त्यांना नोंदवलं गेलंय.. म्हणून सेल्फी घेतायत
तिथे. बाकी काही नाही.”
“अरे पण यांना
पुढे जायचं नाहीये का?? आपल्याला जाहीर नोंदवलंय म्हणजे जबाबदारी टाकलीये आपल्यावर
त्यांनी..”
“एकदा घरातून,
तोंडातून , किंवा कीबोर्डद्वारे बाहेर पडल्यावर त्यांना कुठे काय कळतंय अरे.. एकतर
आपल्याला ट्रॅक करू शकत नाहीत. ”
“मुळात त्यांना
आपली एवढी पडलेलीच नसते की ट्रॅक बीक करतीलआपल्याला..”
“अरे यार..हा
फारच इमोश्नल झालाय. ह्याला लवकरात लवकर याच्या खड्ड्यात पोहोचवलं पाहिजे”
“थांब मी
आलोच, दोन मिनीट”
“अरे एss..एss
कुठे जातोयस.. जायचंय आपल्याला पुढेss ए अरेss”
“तुम्ही व्हा
पुढे, खड्ड्यात भेटूच..”
(चित्र- गुगलकडून साभार)
(चित्र- गुगलकडून साभार)

Comments
Post a Comment