ओळीवरून कविता-१

"संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचिती"

सळसळ सळसळ लाटा येती
मजला त्यांच्यासवेत नेती
सिंहाची आयाळ ही जशी
किनाऱ्यावरी फसफस करती

एक किनारा अलिकडे तर
एक लांबच्या पल्ल्यावरती
कधी नाचतो मत्स्यांमधुनी
कधी कविच्या सल्ल्यावरती

माझ्या अनवाणी पायांना
खोल कुठवरी आत खेचिती
संथ बिलंदर लाटांमधुनी
सागरपक्षी सूर्य वेचिती

असा बापुडा सागर माझा
जिथे सुखाचे वारे फिरती
ओहोटी कधी इथे लागते
कधीतरी मग लागे भरती

अदिती कापडी
२ जानेवारी २०१३
रा. ११.०२ 

Comments