हॅपी बड्डे शारू..

२० डिसेंबर २०१२.
.
.
.
२० डिसेंबर २०१७..

शारू पाच वर्षांची झाली. कशी? माहिती नाही.. केव्हा? याच पाच वर्षांत केव्हातरी.. तिला हातावेगळी करून, जगात मोकळी सोडून पाच वर्ष मात्र झाली.  माझी शारू. माझी. मी लिहिलेली. म्हणजे काय? मी लिहिल्याने, मी जन्म दिल्याने एखाद्या पात्राची मी मालक होते? की पालक होते? त्या पात्राला घडवून जेव्हा एखादी व्यक्ती तरी ते वाचते तेव्हा ते फक्त माझं रहात नाही, त्या वाचकाचं देखील होतं.. मग वाचक त्या पात्रांचा मालक होतो? मी वाचलेले लंपन, सुमी, गटण्या, चम्या, कुसूम, निक सिंक्लेअर, आणि कित्तीतरी लोकं.. लोकं?? माझ्यासाठी जिवंत झाली वाचताना.. पात्र राहिलीच नाहीत. याच जगात दूर कुठेतरी जगतायत ती सगळी.. कदाचित माझ्या डोक्यातही असेल त्यांचं वेगळं विश्व.. पण मला कधीच भेटणार नाहीत एवढं मात्र खरं. माझा हट्टच काय, साधी इच्छाही नाहीये त्यांना भेटायची. गरज नाही वाटत. का हवं भेटायला? 'उत्तररात्र' वाचल्यावर किणीकर, 'भरून आलेलं आकाश' वाचल्यावर धामणस्कर, 'मधुशाला' वाचल्यावर बच्चन, 'व्यामोह' वाचल्यावर गणोरकर, 'कोबाल्ट ब्लू' वाचल्यावर कुंडलकर, 'बटाट्याची चाळ' वाचल्यावर पु.लं., 'चंद्रमाधवीचे प्रदेश' वाचल्यावर ग्रेस, 'एन्कीच्या राज्यात' वाचल्यावर सारंग, 'राज्य राणीचं होतं' वाचल्यावर तांबे, 'सावित्री' वाचल्यावर रेगे, 'रेनमेकर' वाचल्यावर देशमुख, 'अक्षरबाग' वाचल्यावर कुसूमाग्रज, 'रमलखुणा' वाचल्यावर जी.ए., 'कविता' वाचल्यावर खेबूडकर, 'वनवास' वाचल्यावर संत, 'गंगाजल' वाचल्यावर कर्वे.. हे सगळे भेटावे असं वाटलंच नाही.. तशी त्यांनी जन्माला घातलेली पात्रही भेटावी असं वाटलं नाही. तर.. लंपन, सुमी, गटण्या, कुसूम, निक आणि  इतरही..जोडले गेले प्रत्येकाशीच. काहीतरी वेगळ्या भावनेने, संदर्भाने, धाग्याने, नात्याने.. पण त्यांची मालक झाले नाही.  त्यांचे जन्मदाते तरी होते का त्यांचे मालक? ते त्यांचे लेखक जरूर होते, पण मालक नाही! सजीव, निर्जीव..कोणीच आपली मालकी अशी कोणाकडे देतच नसतो मुळी. इतरांनाच ती ओरबाडून घ्यायची असते. त्यात वेगळी धन्यता लाभते माणसांना ! काहीतरी भलंमोठं यश संपादन केल्यासारखं वाटतं त्यात! का वाटत असावं असं ?

मला वाटतं..
Possession comes out of greed..
Greed out of fear,
Fear out of insecurity, and
Insecurity out of..love or attachment maybe (!) !

.
अदिती
२० डिसेंबर २०१७
दुपारी ०१.०७ वाजता.
(वाढदिवसाच्या शुभेच्छा शारू.. 💖 )

Comments