गच्ची- मराठी चित्रपट

#SpoilersAhead.
पाहिला नसेल तर वाचू नका.
.
.
चांगलाय. आवडला.
गच्चीवरून मुंबई कशी दिसते?अशी. क्काय दृश्यं होती एकेक, आहाहा!
वेगळा, हलकाफुलका,छोटा, छान, सुटसुटीत वाटला. छानेय..मस्त कल्पना आणि प्रयत्न.

Continuityच्या काही मेजर चुका झाल्यायत ज्या डोळे उघडे ठेऊन आणि टाईमपास म्हणून न बघणारा लग्गेच पकडतो.
जसं की, श्रीराम (अभय महाजन) बेशुद्ध पडल्यावर कीर्ती (प्रिया बापट)ने काढलेला त्याचा बूट आणि मोजा ! ती काढताना उजव्या पायातला काढते आणि नंतर तो उठतो तेव्हा तो डाव्या पायातला काढलेला दिसलाय!
तिच्या पायाला लावायला बॅगेतून लेप काढतो तेव्हा आणखी अनेक गोष्टी काढतो ज्यात कापूस नसतोच. पण लेप पायाला लावल्यावर मात्र त्याच्याकडे लावायला कापूस असतो, जो कुठून आला, कुठून काढला हे दिसलं नाही. ते आपलं आपण काहीतरी 'समजून' घ्यायचंय.

श्रीराम कीर्तीला शोधायला गच्चीत फिरत असताना तिच्या चपलेच्या छाप्यांचा/ठस्यांचा पाठलाग करतो, आणि चपलांपाशी पोहोचतो तेव्हा तिची एक चप्पल सरळ आणि एक उलटी असते. पण, जेव्हा फ्लॅशबॅक म्हणून तिचा आत्महत्येसाठी जाताना चपलांचे छापे पडण्याचा प्रसंग दाखवलाय त्यात तिने चपला सरळ, व्यवस्थित काढल्यायत. (हे समजवा. ही बाब त्रुटींमध्ये धरायची नसेल तर त्याजागी काय 'समजून' घ्यायचंय ते सांगा. बाय द वे, २३-२४व्या मजल्यांच्या इमारतीच्या गच्चीतून मोबाईल फेकल्यावर तो खाली रस्त्यावर कचरापेटीत पडला बरोब्बर ! तर ते असो. )
बूट-मोज्याचं एक सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी तुलनेत फारश्या मोठ्या नाहीत.
पण, 'अंगाई' गाण्यात गायिकेने 'ऐक'शब्दाचा 'अएक' का तसा काहीसा केलेला उच्चार कानाला टोच टोच टोचला. एकतर मराठी किंवा त्या भाषिक कलाकार घ्यावे, नाही तर त्यांच्याकडून व्यवस्थित काम काढून घ्यावं. ह्या गाण्यात झालेला/केलेला कॉम्प्रोमाईज़ नावाचा प्रकार आजिबात पटलेला नाही.

नापास झालो म्हणून आत्महत्या करायला आलेला चौथीतला मुलगा त्याच्या वडिलांबरोबर घरी गेल्यावर श्रीराम आणि कीर्तीमधला देवावर विश्वास असण्याबद्दलचा जो काही प्रसंग घडला त्याची टोटल लागलीच नाही! त्याने थोडं भरकटायला झालं. प्रसंगाचा आणि कथेचा उद्देश (जर मला वाटतोय तोच असेल तर) तो मुलगा वडिलांसोबत निघून जातो तेव्हाच आपल्यापर्यंत पोहोचतो.
ह्या सगळ्याऽऽच्या आधी वॉर्निंग म्हणून दाखवलेल्या वाक्यांमध्ये 'संबंध' शब्द 'संबध' असा लिहिलाय! कलाकारांच्या नावांमध्ये 'पुनर्वसु' हे नाव 'पुर्नवसु' अस्सं लिहिलंय !!!! हे 'आवराच' होतं बरं का!
बाकी, नोटाबंदीचा उपयोगही झाला हो काहीतरी ! सिनेक्षेत्रात का असेना ! तिथेच
खरं शेवट व्हायला हरकत नव्हती. किंवा त्यानंतर श्रीराम घरातून बाहेर पडतो आणि दार बंद होतं, हा सुद्धा योग्य शेवट होता. या दोन्ही वेळेला 'आता संपला' हे वाटलंच अगदी, की सिनेमा पुढे चालू रहायचा. तशी काय गरज होती शेवटच्या-गच्चीतल्या प्रसंगाची? (खरंच विचारतेय, पाहिला असेल तर तुमचं मत सांगा). तो पुन्हा गच्चीत येतो आणि ती दोघं मिठी मारताता तेव्हा अगदी धाकधुक वाटत होती..की..बाऽपरे..झालं.. जुळतंय यांचं.. ! पुढे तो तिला एक वचन मागतो तेव्हा तर पटलंच होतं की झालंऽऽच..हा मुलगा उदार मनाने हिला लग्न करून सांभाळणार.. पण *नाऽहीऽ * दाखवलं हे काही. अनेकानेक धन्यवाद.
पार्श्वसंगीत सुंदर आहे. जियो संगीतकार. प्रकाशित करा हो पार्श्वसंगीत वेगळ्याने. मस्तच्चे ते..
आणि शेवट जो केलाय ना, ती कल्पना 'लय भारी' होती. श्रेयनामावली संपेपर्यंत त्यांचं संभाषण आणि ते विनोद. विनोद खरंच चांगले होते, 'भरं' का! 
(मध्यांतरात अभय महाजन आणि दिग्दर्शक स्वतः येऊन गेले, फोटो काढला हा बोनस. )
अदिती.
२४.१२.१७

Comments