अण्णा..
तुमची आठवण येतेय. बऱ्याचदा येते. मुख्यत्वे एकटी असतानाच. १६ वर्षं झाली तुम्हाला जाऊन. कुठे गेलात माहिती नाही. माणूस 'गेला' म्हटल्यावर कुठे जातो तिथेच गेला असाल. पोहोचला असाल. किंवा नसालही, प्रवासात असाल अजूनही पोहोचण्याच्या. प्रवासात असाल तर चालत नक्कीच नसाल. तुमच्या नेहमीच्या सायकलीवरच असाल.तसेच दिसता अजूनही मला, तसेच आठवता. तुमच्या सायकलीच्या पुढच्या मधल्या दांड्यावर मला बसायला म्हणून छोटंसं सीट लावून घेतलं होतं तुम्ही. तुम्ही गेल्यावर केव्हा ते आठवत नाही पण सायकल विकली आम्ही. दोन्ही सीटं रिकामीच असायची. पार्किंगमधल्या नावांच्या पाटीखाली उदास असताना मान वळवून असल्यासारखी भिंतीला टेकून असायची सायकल. मग विकली. वयाचे, प्रगल्भतेचे, समजूतदारपणाचे सगळे मुखवटे उतरवून हमसून हमसून रडावसं वाटतं तुम्हाला हाक मारत, अण्णा. पुन्हा भूतकाळात जावसं वाटतं. त्याच घरात, त्या सायकलीपाशी, त्या रस्त्यांवर. तुम्हाला शोधावसं वाटतं.
हेच मुखवटे उतरवलेले असताना अजून एक प्रश्न विचारून घेते. तुम्हाला येते का हो माझी आठवण? कित्तीदा स्वप्नात दिसता मला. तेव्हा तुम्ही असाल तिथून माझी आठवण काढत असाल आणि म्हणून स्वप्नात येता असं समजून घेऊ का मी? तसंच समजून घेते. त्याशिवाय मनाला समजवण्याचा दुसरा काहीच पर्याय दिसत नाही. तारतम्य नसलं तरी आशा म्हणून असं समजून घेते. कारण माणूस गेला म्हणजे नक्की काय होतं हे अजून कोणी सिद्ध करू शकलेलं नाही. मग आहात तुम्ही कुठेतरी, अदृश्य स्वरूपात. तुमच्या तुमच्या प्रवासात. पण आहात. असं समजायला काय हरकत आहे ना! कुठे का असेना, आहात हे फार धीराचं वाटतं.
एकटं वाटलं की हमखास आठवण येतेच तुमची. वयाच्या छक्के-पंजे, छापे-काटे न कळण्याच्या टप्प्यात तुम्ही भेटलात. त्यातलं काही माझ्या वाट्याला आलं नाही, किंवा मला समजलं नाही. पण आता जे काही आठवतं ते चांगलंच आठवतं. तुम्ही माझं काय वाईट केलं हे आठवायला गेलं की काहीच सापडत नाही. आठवत नाही. आठवतं ते फक्त-
तुम्ही माझ्याशी तो प्लास्टिकचा, छोटुसा हिरवा कॅरम खेळणं. घराला रंग देत होतो तर घरी कोणीतरी हवं म्हणून तुम्ही रहायला आला होतात. मग मी दुपारी शाळेतून आले की दप्तर न ठेवता, बुट-मोजे न काढताच मला कॅरम खेळायचा असायचा. मग तुम्ही नाही म्हणायचात आणि माझ्यासाठी ताट वाढून आणायचात. शाळेत काय काय झालं विचारायचात. मग माझं जेवण झालं, कपडे वगैरे बदलून झाले की आपण काय डाव मांडून बसायचो ना! थेट संध्याकाळी आई ऑफिसहून येईपर्यंत. कितीही खेळायचो. तुम्ही कधीच कंटाळा केला नाहीत, नाही म्हणाला नाहीत, पुरे झालं म्हणाला नाहीत.
आणि, ते, ते आपण लपाछपी खेळायचो ते!! 😃. बेडरूममधल्या त्या लोखंडी रॅकमध्ये कपड्यांच्या पसाऱ्यात मी आडवी होऊन लपायचे, लपायचे काय झोपायचेच पूर्ण! आठवतंय? आणि मग मी दिसले असूनही तुम्ही सरळ गॅलरीत चालत जायचात मला शोधायला, तिथून परत यायचात, स्वयंपाकघरात जायचात. मग मी तुम्हाला धप्पा द्यायला त्या रॅकमधून माझ्यासोबत आणखी दहा कपडे खाली पाडत उतरायचे आणि पळत पळत तुमच्या मागे यायचे. हसू आलं लिहीता लिहीताही. :)
खरंच कधीच नाही भेटणाj का हो पुन्हा? कधीच नाही? मी अजूनही एकटी आहे अण्णा. मला खेळायचंय. पुन्हा. खूप. तुम्ही गेल्यापासून माझ्याशी खेळायला कोणीच नाहीये अण्णा. या ना, प्लीज.
(४ एप्रिल २०१८, रात्रौ १२ः३२ )

Comments
Post a Comment