पाळणाघर ते वृद्धाश्रम- सोईस्कर संस्कारपाठ

"बाबा, तुम्ही तुमच्या लग्नात मला बोलावलं नाही. मी पण माझ्या लग्नात तुम्हाला बोलावणार नाही"

मदर्स डेच्या निमित्ताने वृद्धाश्रमांमधले फोटो शेअर करून आजच्या पिढीच्या नावाने गळे काढून झाले असल्यास, आपले चष्मे उतरवून ह्या डोळ्यांनीही पहा.
मुलं जन्माला घालणं म्हणजे म्हातारपणाची सोय हा विचार चुकून जरी काही क्षणांसाठी का होईना डोक्यात येऊन गेला असेल तर तो निर्णय सर्वस्वी स्वार्थी आहे. स्वार्थीच असेल. कोणताही माणूस कधीच कुणाचा गुलाम नसतो, कुणाच्या इच्छांना बांधिल नसतो. बालक-पालक म्हणून तुमचं नातं नेहमी सुदृढ असेल तर अशी वेळ अपवादात्मकच येईल.

बाळाच्या जन्मानंतरचे सुरूवातीचे काही महिने सोडले तर नंतर आपापल्या नोकरी-करिअरला प्राधान्य देऊन आपला आणि आपल्या मुलांचा भविष्यकाळ अजून चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी मुलाबाळांना पाळणाघरात ठेवल्याने तुमचे त्यांच्यावरचे प्रेम कमी होत नाहीच. नसतेच. त्याचा अर्थ मुलाबाळांची तुमच्या घरात, करिअरमध्ये अडचण होत असते असाही नसतोच. तो सगळ्यांच्या भल्यासाठी त्या परिस्थितीवर त्यावेळी शोधलेला चांगला मार्ग असतो. पाळणाघरात मूल ठेवताना अनेक पर्यायांचा अभ्यास करून, माहिती काढून त्यातल्या त्यात योग्य असं पाळणाघर निवडलं जातं. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा-आकांक्षा-महत्त्वाकांक्षा अशा रितीने पूर्ण होतात.

तीच मुलं लहानपणापासून तुमची जिद्द, महत्त्वाकांक्षा, अडचणींवर योग्य तोडगे काढण्याचा प्रयत्न पाहून मोठी झाल्यावर तुमच्या पावलांवर पावलं टाकत चालली तर ती कृतघ्न कशी होतात? त्यांच्या वयाचे असताना तुम्ही वागलात तसेच ते त्याच वयात वागतायत. चुकतं नेमकं कुठे, तर ह्यासगळ्याचा संस्कृतीशी, संस्कारांशी संबंध जोडून. बाय द वे, संस्कार काही वेगळ्याने करावे लागत नाहीत. ते होतात. तुम्ही लहान मुलांसमोर जसे वागता, बोलता, वावरता त्यावरून ते आपोआप होतात. तुम्ही मुलांना चार वेळा स्तोत्र म्हण सांगितल्यावर ती ऐकणार नाहीत पण, त्यांना न सांगता रोज स्वतः चार वेळा स्तोत्र म्हटली तर तीही म्हणतील. तुम्ही मोबाईलवर खेळत असताना मुलांना "पुस्तक वाच" म्हणून दरडावून काहीच होणार नाही. लहान मुलांची निरीक्षण शक्ती भयंकर असते आणि बहुतांश गोष्टी ते निरीक्षणातूनच शिकतात.

तर, आता "आम्ही आमच्या मुलांना पाळणाघरात ठेवलं, जन्मदात्या आईबाबांना नाही !" अशी कमेंट करणाऱ्यांनो- तुमच्या आईबाबांसारखी अनेकवचनात मुलं जन्माला घाला! (हा सल्ला नाही. मी कोणत्याही पक्षाची नाही. मी अपक्षही नाही. मी काहीच नाही. कोण तुम्ही? कुठली पृथ्वी? मै कहां हूँ? )
मग ती सगळी मिळून तुम्हाला तुमच्या कठीण-सोप्या सगळ्या काळात नक्की सांभाळतील. "आम्ही नै बॉ असं केलं, आजची पिढीच अशी स्वार्थी" असं म्हणून तुमच्यापर्यंत आलेली परंपरा पुढे चालू ठेवायची असेल तर ती तुम्ही कितपत तंतोतंत पाळली हे तपासा. आपण भावंडं मिळून आळीपाळीने आईबाबांना सांभाळताना स्वतः विभक्त कुटंबात राहून, एकच मूल जन्माला घालून त्यांना वेठीला धरणं बरोबर नाही.
तुम्हाला मुलांना पाळणाघरात ठेवताना वाईट वाटतं तसं त्यांनाही तुम्हाला अशा कोणत्याही ठिकाणी ठेवताना वाटतंच. पण "तुम्हाला वाईट वाटत असतं तर तुम्ही असं केलंच नसतं" असा भावनिक पवित्रा घेऊन त्यांच्या खऱ्या भावनांवर शंका घेणं, त्या झुगारून लावणं हेच आपल्याला करायचं असतं.

शेवटी, तुम्ही तुमच्या इच्छा-आनंदासाठी मूल होऊ द्यायचा निर्णय घेतला आणि त्याला स्वतंत्र व्यक्ती म्हणून शिकवलं वाढवल्यावर, तीसुद्धा तुम्हाला त्यांना तुमची प्रॉपर्टी असल्यासारखी वागवू देणार नाहीत.
हे कोणाला लागू होतं ते तुम्हा सगळ्यांनाच नीट माहितीये. कालच्या, आजच्या, परवाच्या कोणत्याच पिढीतली सगळीच मुलं/आईबाबा सरसकट वाईट नाहीत. असे वागत नाहीत. अनेक एकटी मुलंही आईबाबांना नीट सांभाळतात. अनेक भावंडंही आईबाबांना 'कटकट' म्हणून वृद्धाश्रमात ठेवतात. ही पोस्ट हा निर्णय 'कटकट' म्हणून न घेता, निर्मळ व प्रेमळ मनाने, चांगल्या हेतूने घेणाऱ्या आणि गेरसमज व टोमण्यांचे बळी ठरणाऱ्यांसाठी आहे.
(नाऊ, फायर ऑन यू ऑल संस्कृती-संस्काररक्षक्स)

Comments