समजून घ्यायचा कंटाळा आलाय..

मुर्ख माणसं सुखी असतात. हेकेखोर माणसंही सुखी असतात. त्यांना फक्त एकच बाजू माहिती असते. स्वतःची. इतरांची नाही. समोरच्यालाही बाजू असू शकते हेच मुळात माहिती नसतं त्यांना. माहिती असण्यापेक्षा अशी काही गोष्ट अस्तित्वात असू शकते किंवा असते याची कल्पनाच त्यांना ठाऊक नसते. मग ती समजून घ्यायचा प्रश्न येतोच कुठे?
प्रश्न कुठे येतो, तर समजणाऱ्यांना. कल्पना असणाऱ्यांना. ज्यांना माझी बाजू ही आणि हीच खरी बाजू असं वाटत नसून माझी बाजू ही माझी बाजू, समोरच्याला त्याची बाजू असू शकते, असं ज्यांना वाटतं, माहिती असतं, कळतं, समजतं, पटतं, ते खरे दुःखी. त्यांची आयुष्यात सगळीकडे गोची. का कुणावर राग धरावा, तो असं वागला त्याला परिस्थिती जबाबदार होती, त्याला त्याची बाजू होती असं म्हणत म्हणत, समजून घेत त्यांचे दिवस स्वतःलाच शांत करण्यात, राग पिण्यात जातात. मग काय, अंदर ही अंदर सडे जा रहे हो..

Comments