एकदा एक स्वप्न पडलं.
काळ्याशार दगडाची एक गुहा आहे, खूप
उंच आहे, पण वरून उघडी आहे. त्यातून स्वच्छ निळं आभाळ दिसतं. त्या गुहेत जायला एक
दरवाजा आहे. ही गुहा थंडगार, शांत पाण्यात आहे. सगळं निर्जन ठिकाणी. म्हणूनच इतकं
शांत असावं. मी एका होडीतून उभी राहून वल्हवत तिथे आत जाते. तो गारवा, ती शांतता
अनुभवत असते. कुठून आले, कुठे चाललेय, का चाललेय काहीच माहिती नसतं. त्या दारातून
वल्हवत आत गेल्यावर समोर समोर मी जात रहाते. आणि त्या गुहेच्या समोरच्या भिंतीला/
दगडाला जाऊन माझी होडी टेकणार इतक्यात कशी माहिती नाही पण माझी होडी पलटते.
आता मी पाण्यात पडले आहे. माझ्यावर
होडी आहे. होडी मला पाण्यावर तरंगताना दिसतेय. वर आकाश थोडं धुसरसं पण निळा रंग
ओळखता येण्याइतपत दिसतंय. मी हळूहळू खाली खाली जातेय. पाण्याचा गारवा मला
जाणवतोय. ओलावा जाणवतोय. पाणी माझ्यात मुरतंय. त्वचेच्या बारीक बारीक छिद्रांमधून ते
माझ्या आत जातंय. त्या छिद्रांमधून ते थंडगार पाणी आत गेल्याने माझा कण आणि कण
वेगळा होतोय, सुटा होतोय. मी पाण्यात विरघळतेय. हळूहळू खाली जातेय. वर तरंगत
दिसणारी होडी हळूहळू छोटी छोटी होताना दिसतेय. मी पाण्यात पडल्यावर पाण्यात
उमटलेले तरंगं मला पाण्याखालून पहायला मिळाले. मरत असताना. खूप सुंदर दिसले.
पाण्यात असूनही मला फार ताजातवाना श्वास घेता येत होता. दीर्घ श्वास घेता येत
होता. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या किंवा महत्त्वाच्या
नव्हत्या पण उगाच लक्षात राहिलेल्या अनेक गोष्टी जुन्या कॅमेराचा निगेटीव्ह रोल
फिरवल्यासारख्या माझ्या डोळ्यासमोर फिरून गेल्या. अनेक आनंदाचे क्षण दिसले. अनेक
जणांवर काही काही कारणांमुळे धरलेला राग दिसला. मी पाण्यात विरघळत असताना तो रागही
विरघळून गेला.
खूप मोकळं, सुटसुटं, हलकं वाटत होतं.
भावनांच्या, वेदनांच्या, कष्टांच्या, अपेक्षांच्या स्वतः धरून ठेवलेल्या बेड्या
आपोआप मोकळ्या होताना दिसल्या. पाण्यात खाली जात असूनही फार हलकं वाटत होतं. वर दिसणारी
होडी एव्हाना छोटाश्या बिंदूएवढी दिसत होती. मगासचं दिसणारं निळं आकाशही आता
जेमतेम दिसत होतं. थोडं काळोखत चाललं होतं. गारवा वाढत चालला होता. आकाशाचा निळा
जाऊन पांढरा रंग दिसायला लागला होता. होडी नाहीशी होऊन आता फक्त आकाशाचा पांढरा
रांगोळीएवढा ठिपका दिसत राहिला होता. घटनांची दिसणारी फिल्मही संपत आली होती. मी
तळाशी पोहोचलेय हे समजत होतं.
आता माझी पाठ तळाला टेकणार होती.
काहीच इंचाचं अंतर शिल्लक राहिलं होतं. फिल्म संपली. पाण्यातल्या ओल्या काळोखाची
जाड आणि जड शालं माझ्यावर पांघरली जातेय असं वाटू लागलं. माझी पाठ तळाला टेकली आणि
मला जाग आली.
जाग आल्यावरही प्रचंड हलकं आणि
ताजंतवानं वाटत होतं. हे स्वप्न नसतं तर बरं झालं असतं. पाण्यात असं राग, लोभ, प्रेम, भावनांसह
विरघळत मोकळं व्हायला मला आवडेल. हे स्वप्न नसतं तर फार बरं झालं असतं.
असा झोपेतच मृत्यू यावा. रात्री पाठ
टेकताना उद्याच्या सकाळपासून अगदी आयुष्यातल्या अनेक वर्षांपर्यंतचे प्लॅन आखून
ठेवलेले असताना, उद्याच्या अपॉईंटमेंट्स घेतलेल्या असताना, मिटींग ठरवलेल्या
असताना, कोणाशी तरी काहीतरी खूप बोलायचं राहिलेलं असताना, कोणाला तरी बराच वेळ
निवांत भेटायचं ठरवलेलं असताना, इतके दिवस घेतलेल्या कष्टाचं काहीतरी फळ मिळणार
असल्याचे दिवस जवळ येत असताना, दोन महिन्यात एफ.डी. मॅच्युअर होणार असताना,
पुढच्या आठवड्यात जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असताना, कधीपासून राहिलेली पावभाजी
खायची असताना, अनेक मेल्स चेक करायचे राहिलेले असताना, खूप वाट पहात असलेला सिनेमा
बघायचा राहिलेला असताना, गाडी धुवायची राहिलेली असताना, एक छान मोगऱ्याचं छोटंसं रोपटं
आणून लावायचं मनात असताना, दोन दिवसांत पगार होणार असताना आदल्या रात्री झोपेतच
मरण यावं.
गोष्टी पूर्ण करून जाण्यात काही अर्थ
नाही. मज्जा त्याहून नाही. इतकी वर्ष जगलो तरी इतक्या साध्या साध्या गोष्टी
बोलायच्या, खायच्या, करायच्या, बघायच्या, सांगायच्या राहून गेल्याच. अजून एक दिवस
मिळाला असता तरी काय फार दिवे लावले नसते. अर्ध्यात निघालेलंच बरं. अर्ध्यात
म्हणण्यापेक्षा वेळेत. आपापल्या.
दुसऱ्या दिवशी उठवायला आलेलं कोणीतरी
बघेल की ही आज फार वेळ झोपलीये. बरं नसेल.
डोक्याशी चार अलार्म वाजूनही उठली नाही म्हणून बघायला कोणी आणखी जवळ येईल आणि क्षणार्धात
घळाघळा रडायला लागेल. माझ्यावर पडलेल्या अश्रूंनी किंवा झोपले असतानाही कानाशी
फोडलेल्या टाहोने मला जाग येणार नाही. खरकटं शरीर पडून राहील. चार जणांना कळवलं
जाईल. कोणाचा काही कामानिमित्त माझ्या फोनवर फोन आलाच तर तो उचलून त्यालाही
सांगितलं जाईल. त्या माणसाला काय बोलावं कळणार नाही. तो ही धावत पळत येईल. सराईत ४
अनुभवी माणसं तिरडी बांधायला घेतील. रक्त्याच्या नातेवाईकांचे माझ्या नाकात
कापसाचे बोळे ठेवण्यासाठी हात धजणार नाहीत. काल रात्रीपर्यंतच्या माझ्या हालचाली
आठवून सगळे आतल्या आत विखूरतील.
None of my business. हे बघायला मी नक्कीच थांबणार नाही.

My dream death
ReplyDeleteसुखद विलीनीकरण . आदिती मैत्रीणी मरण जगलो तुझा लेख वाचून .
ReplyDeleteरणजित घरत
Deleteमस्त. ...
ReplyDelete